घरफोडी करणारा गजाआड

| पनवेल | वार्ताहर |
पनवेल परिसरात दोन ठिकाणी घरफोडी करणार्‍या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांच्या विशेष पथकाने गजाआड करून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
शहरातील कोहिनुर टेक्निकल इन्स्टीट्यूट येथील पंप रूमचे बंद खिडकीची काच उघडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून कॉम्प्युटर लॅबमधील 60 हजार रुपये किमतीचे कॉम्प्युटर, प्रिंटंर व इतर साहित्य चोरून नेला होता, तसेच दिलीप करमसिंग धरोड (61) यांचे धीरज लॉन्ड्री, लाईन आळी पनवेल येथील ऑन्डीच्या पाठीमागील खिडकीचे ग्रिल कापून त्यातून आत अज्ञात चोरट्याने प्रवेश करून लॉन्ड्रीमधील देवार्‍यातील महागड्या वस्तू व देवाच्या चांदीच्या मूर्ती चोरीस गेल्या होत्या.

याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोउपनि अभयसिंह शिंदे, पोहवा रविंद्र राऊत, पोना परेश म्हात्रे, पोना महेंद्र वायकर, पोना विनोद देशमुख, पोना रवींद्र पारधी, पोशि विवेक पारासुर, पोशि प्रसाद घरत आदींच्या पथकाने सदर आरोपीचा शोध घेत असताना तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या मिळालेल्या माहितीद्वारे या गुन्ह्यातील आरोपी फैझान संतोष परमार (32) हा पाशीबाई इंदिरानगर झोपडपट्टी या ठिकाणी वास्तव्यास असल्याचे माहिती मिळाली. याठिकाणी सापळा रचून पोलिसांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून वरील दोन्ही गुन्ह्यातील सुमारे 70 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याच्या अटकेमुळे पनवेल परिसरातील अनेक घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version