Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात वासरू ठार

म्हसळा तालुक्यातील चाफेवाडी येथील घटना

| म्हसळा | प्रतिनिधी |

म्हसळा तालुक्यातील चाफेवाडी येथे पहाटे वाघाने गोठ्यात शिरून एका वासरावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चाफेवाडी येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्यात पाच वासरे होती. पहाटे वाघाने गोठ्यात शिरून एका वासराला उचलून नेले. सकाळी शोध घेतला असता गावाजवळच वासराचा मृतदेह आढळून आला. वाघाने गळ्याला चावा घेत तसेच पोट फाडून वासराला ठार केल्याचे दिसून आले.

घनदाट जंगलालगत हा परिसर असल्याने वन्यप्राण्यांचा वावर असतो. मात्र भरवस्तीजवळ वाघाने जनावरावर हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे. वनविभागाने तातडीने गस्त वाढवून पिंजरा लावावा तसेच मृत वासराची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Exit mobile version