पनवेल बस स्थानकासाठी आंदोलनाची हाक

| पनवेल । वार्ताहर ।

राज्य परिवहन मंडळाच्या पनवेल बस स्थानकाला 2018 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली आहे; मात्र आजतागायत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नसल्यामुळे प्रशासनाला जागृत करण्यासाठी पनवेल प्रवासी संघाने गुरुवारी (ता. 3) आंदोलनाची हाक दिली आहे.

पनवेल येथे सुरतच्या धर्तीवर स्थानक उभारण्यात येणार आहे. यासाठीच्या आराखडा मान्यतेअभावी रखडल्याने पनवेल बस स्थानकाचा प्रश्‍न अंधातरिच राहिलेला आहे. 2018 मध्ये या स्थानकाला प्रशासकीय मान्यता मिळाली असली, तरी अनास्थेमुळे आजतागायत या स्थानकांचे काम मात्र सुरू झालेले नाही. त्यामुळे पनवेल प्रवासी संघाने आरपारचा लढा देण्याचा निर्धार केला आहे. याच अनुषंगाने गुरुवारी आंदोलन केले जाणार आहे. या वेळी आंदोलनात सिटिझन युनिटी फोरम, ग्राहक संरक्षण मंच, पनवेल संघर्ष समिती, ज्येष्ठ नागरिक संघ यांसारख्या सामाजिक संस्थांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राजकीय पक्षांच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न
पनवेल प्रवासी संघाच्या आंदोलनाला सर्व स्तरांतून पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यात शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशा राजकीय पक्षांनादेखील आंदोलनात सहभागी होण्यासाठीचे आवाहन पनवेल प्रवासी संघांच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.

Exit mobile version