नदीत रासायनिक प्रदूषण करणार्‍या चालकावर गुन्हा दाखल

| खोपोली | प्रतिनिधी |

खोपोली शहरालगत असलेल्या पाताळगंगा नदीत मागील काही महिन्यांपासून बेकायदेशीररित्या दुर्गंधीयुक्त रसायन सोडणार्‍या टँकर चालकाविरोधात खालापूर पोलीस ठण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. खोपोली शहरातून वाहणार्‍या पाताळगंगा नदीमधील वाढते जलप्रदूषण व दुर्गंधीमुळे विविध आजार निर्माण होत आहेत. नगरपरिषद क्षेत्रातील सदनिकाधारक, खाद्यपदार्थ उद्योजक नदी पात्रातील पाण्यावर जलशुद्धीकरण करून ते पाणी पिण्यासाठी वापरतात ज्याने आरोग्य धोक्यात पडत आहे, अशा चर्चांना उधाण आले आहे.

अनेक दिवसांपासून प्रक्रिया न करता विषारी रसायन नदीत बेकायदेशीरपणे सोडत असल्याने उच्च रक्त दाब, श्‍वास गुदमरणे, अस्वस्थ वाटणे, मळमळणे, उलट्या अशा आरोग्याबाबतच्या तक्रारी नागरिकांकडून दररोज ऐकायला येत आहेत. 22 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री टँकरमधून वाहन चालक वसीम चौधरी व अशफाक अहमद, रा. कुर्ला, मुंबई यांनी तालुका खालापूर वाणीवली येथील रॉयल कार्बन ब्लॅक प्रा. लि. मधील टाकाऊ रसायन खोपोली नगरपरिषद हद्दीतील हाळ बुद्रुक गावालगत असलेल्या पाताळगंगा नदी पात्रात सोडत असल्याची माहिती समजताच मनसे रस्ते आस्थापन विभाग संघटक संजय तन्ना यांनी सदर प्रकरणाची माहिती खालापूर पोलीस प्रशासन व प्रदुषण नियत्रंण मंडळाचे क्षेत्र अधिकारी योगेश गोरे व शिवानंद बसवदे यांना देऊन स्वतः घटनास्थळी समक्ष पाहणी केली.

सदर प्रकरणी तपासात टँकरमधील घातक रसायन रॉयल कार्बन ब्लॅक प्रा. लि. या कंपनीचे असल्याचे वाहन चालकाने सांगितल्याने पकडलेल्या ट्रकमधील व वाणीवली ह्या ठिकाणच्या कंपनीमधील टँक येथून प्रदुषण नियत्रंण मंडळाचे क्षेत्र अधिकारी योगेश गोरे व शिवानंद बसवदे यांनी रसायनाचे नमुने तपासणीसाठी घेऊन सदर अहवाल तयार केला. ह्या प्रकरणी खालापूर पोलीस स्टेशन अंतर्गत ऍक्ट भा. द. संहिता 1860 नुसार कलम 336, 269, 270, 277, 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्ह्यातील पुढील तपास निलेश बाळाराम कांबळे अधिकारी म्हणून करीत आहे.

Exit mobile version