। अलिबाग । प्रतिनिधी ।
भाजपच्या कार्यकर्त्याला भाजपचे महेश मोहिते यांनी मारहाण केली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महायूतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांचा अर्ज भरण्यास येणार नसल्याचा राग धरून त्यांनी मारहाण केल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पंकज अंजारा असे या जखमीचे नाव आहे. अंजारा गेल्या अनेक वर्षापासून भाजपमध्ये काम करीत आहेत. भाजपा अलिबाग मुरूड विधानसभा संयोजकम्हणून ते कार्यरत आहेत. ते आमदार महेंद्र दळवी यांच्या गावातील भाल परिसरात राहत आहेत. पक्षवाढीसाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. पक्षाने दिलेल्या सुचनेप्रमाणे महायुतीबरोबर राहून ते काम करीत आहेत. परंतु महेंद्र दळवी यांच्याकडून भाजपच्या कार्यकर्त्यांना हिनतेची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे त्यांच्यापासून ते कायमच दूर राहिले आहेत.
महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी भरायचा होता. त्यावेळी भाजपचे अॅड. महेश मोहिते यांनी अंजारा यांना भेटून महायूतीचा अर्ज भरण्यासाठी येण्यास सांगितले. अर्ज भरण्यास येणार नसल्याचे महेश मोहिते यांना सांगितल्यावर त्यांना राग आला. महेश मोहिते व त्यांचे सहकारी यांनी पंकज अंजारा यांना शिवीगाळी करून धक्काबुक्की केली. त्यानंतर मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. त्यात अंजारा यांची पाच तोळ्याची सोन्याची चेन गहाळ झाल्याचे त्यांचे मोठे नुकसान केले. ही घटना रविवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी अंजारा यांनी अलिबाग पोलीस ठाणे गाठले. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. अखेर अंजारा यांनी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी महेश मोहिते यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्यासाठी पाच तास प्रतिक्षा करावी लागली. पंकज अंजारा व त्यांचे कुटूंबिय रात्रभर पोलिस ठाण्यातच होते.आमदारांच्या दहशतीला भिक न घालता अंजारा पती-पत्नी यांनी पक्ष कार्य सुरूच ठेवले आहे. त्यांना वाढता प्रतिसाद पाहून त्यांच्या विरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप पंकज अंजारा यांनी केला आहे.
गृहमंत्री फडणवीसला घाबरत नाही भाजपचे महेश मोहिते यांची आरेरावी पंकज अंजारा यांना शिवीगाळी करीत त्यांना मारहाण करण्यात आली. त्यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. गृहमंत्री यांना जाऊन सांगितले, तरीही मला काही फरक पडत नाही. अशी उद्दाम भाषा महेश मोहिते यांनी वापरली. पक्ष श्रेष्ठींबद्दल केलेल्या अपशब्दाबाबत भाजपच्या काही पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. थेट रस्त्यावर भाजपच्या पदाधिकार्याला गुंडगिरी करीत मारहाण करणे व पक्षश्रेष्ठीबद्दल मुक्ताफले करणार्या मोहितेवर भाजप काय कारवाई करते? याकडे लक्ष लागले आहे.