। पनवेल । वार्ताहर ।
लोकसभा निवडणूकीमुळे राज्यात सर्वत्र आचारसंहिता लागू आहे. विना परवानगी कोणत्याही राजकीय पक्षांनी जाहिराती करु नये असे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाचे असतानासुद्धा कामोठे येथे राजकीय संदेश देणार्या भिंती रंगविण्यात आल्या होत्या. नागरिकांनी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अॅपवर केलेल्या तक्रारीनंतर ही बाब उजेडात आली. काही मिनिटांत मावळ लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्यांनी याची गंभीर दखल घेत अनोळखी राजकीय कार्यकर्त्यांविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याबाबत तसेच, महाराष्ट्र महापालिका मालमत्ता विदृपीकरण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला.
कामोठे येथील सेक्टर 34 मधील कुपणाच्या भिंतीवर फिरसे एकबार मोदी सरकार असा संदेश लिहून त्याशेजारी कमळाचे चिन्ह काढले होते. कामोठेच्या दक्ष नागरिकांनी याबाबत सिव्हीजीलअॅपवर निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यावर मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दिपक सिंघला (पी.एम.आर.डी.ए.चे अतिरीक्त आयुक्त) सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके (उपविभागीय अधिकारी पनवेल) यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक आयोगाने नेमलेले पथक काही मिनिटांत घटनास्थळी पोहचले. भिंतीवरील राजकीय संदेश पुसून टाकण्यात आला आणि कामोठे पोलीस ठाण्यात संदेश लिहिणार्या अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये याकरिता मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विधानसभा क्षेत्रात 6 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. नागरिकांना सिव्हीजील अॅपव्दारे आचारसंहिता भंग झाल्यास तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तक्रारीनंतर 10 मिनिटांत निवडणूक आयोगाचे पथक घटनास्थळी भेट देणार तसेच, पुढील 90 मिनिटांत या तक्रारींवर कारवाई करुन त्याचा अहवाल निवडणूक आयोगाला देणार आहे. रविवारच्या प्रकरणात कामोठे पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मालमत्ता विरूपनास प्रतिबंध अधिनियम 1995 चे कलम 3 व महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 244 व 245 अन्वये दाखल करण्यात आली आहे.
राहुल मुंडके, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, मावळ मतदारसंघ
33 मावळ लोकसभा मतदार संघामधील 188 पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार असून, आदर्श आचारसंहितेचा भंग करणार्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई तसेच संबंधीत अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.







