मनसेच्या महिला जिल्हााध्यक्षावर फसवणूकीचा गुन्हा दाखल

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

बनावट शासकीय शिक्के, सह्या वापरुन इमारतीचे बांधकाम केल्याप्रकरणी मनसे महिला जिल्हाध्यक्षा आदिती सोनार यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

तालुक्यातील विहिघर गावात एका नामांकीत बांधकाम व्यावसायिकाने जिल्हाधिकार्‍यांच्या नावाचे बनावट शिक्के, ठसे तसेच बनावट सह्या, शासकीय अभिलेख व आदेश बनवून चार मजली इमारतीचे बांधकाम सुरु केल्याची बाब उघडकीस आली होती. याप्रकरणी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.त्यनुसार बांधकाम व्यावसायिक आदिती सोनार यांच्या विरोधात खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनार (आरंभ इन्फ्राकॉर्न) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला विभागाच्या रायगड जिल्हा अध्यक्ष आहेत.

विहीघर ग्रामपंचायत हद्दीत बांधकाम करण्यासाठीसंबंधित जागेचे प्राधिकरणाकडून परवानगी घेतल्याचे बनावट कागदपत्र त्यांनी बनवले होते. बांधकाम परवान्यावर जिल्ह्याधिकार्‍यांची सही व शिक्के केल्याचे दाखवून शेकडो ग्राहकांकडून बुकिंग सुद्धा घेण्यात आले होते. बांधकाम करण्यासाठी वापरण्यात आलेली कागदपत्र बनावट आहेत, अशी तक्रार मनसेच्याच एका पूर्व पदाधिकारी मिलींद खाडे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. खाडे यांनी माहितीच्या अधिकाराखाली सर्व कागदपत्र मागवून हा प्रकार उघडकीस आणला. यानंतर खाडे यांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकाविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. तक्रार अर्जावर शहानिशा केल्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिकाने बनवलेले पेपर या कार्यालयातून निर्गमित केले नसल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी दिल्याने नेरा परिसराचे सर्कल अधिकारी सुरेश मोराळे यांनी केलेल्या तक्रारी वरून आदिती सोनार यांच्या विरोधात खान्देश्‍वर पोलिसांनी कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version