जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल! जाळपोळ करुन रास्ता रोको

। मुंबई । वृत्तसंस्था ।

‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या शो थांबवून प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी राज्याचे माजी मंत्री आणि आ. जितेंद्र आव्हाड यांना अटक करुन रविवारी त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. मात्र आता आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर ठाणे शहरातील अनेक ठिकाणी जाळपोळ करुन वाहतूकीमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या समर्थकांनी केला आहे. आव्हाड यांनीही आक्रमक भूमिका घेत थेट आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.

आव्हाड यांच्याविरोधात भादंविनुसार कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून. लैंगिक शोषण, मारहण किंवा महिलांच्या स्वाभिमानाला धक्का लावणारं कृत्य करणाऱ्यांविरोधात या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. याच कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आज सकाळपासूनच ठाण्यात तणाव निर्माण झाला असून आव्हाड यांच्या विवियाना मॉलजवळच्या घरासमोर काही ठिकाणी रस्त्यावर जळलेले टायर टाकून वाहतूक कोंडी करण्याचा प्रयत्न झाला.

“पोलिसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासांत २ खोटे गुन्हा दाखल केले आहेत. ते ही ३५४… मी पोलिसांच्या या अत्याचाराविरुद्ध लढणार… मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे… लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत,” असं ट्वीट आव्हाड यांनी केलं आहे.

Exit mobile version