माजी पंतप्रधान शेख हसीनांवर खुनाचा गुन्हा दाखल

| बांगलादेश | वृत्तसंस्था |

बांगलादेशची राजधानी ढाका येथे 19 जुलै रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात किराणा दुकानाचे मालक अबू सईद यांचा मृत्‍यू झाला होता. या प्रकरणी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि इतर सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे वृत्त ‘डेली स्टार’ने दिले आहे.

बांगलादेशमध्‍ये आरक्षणाविरोधात तरुण रस्‍त्‍यावर उतरले. काही तासांमध्‍ये संपूर्ण देशभर या आंदोलनास हिंसक वळण लागले. अखेर 5 ऑगस्‍ट रोजी शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत तात्‍पुरता भारतात आश्रय घेतला आहे. बांगलादेशमध्‍ये जुलै महिन्‍याच्‍या सुरुवातीला सुरू झालेली. निदर्शने सुरुवातीला शांततापूर्ण होती, परंतु इस्लामी सैन्याने घुसखोरी केल्यामुळे हिंसक झाले. पोलिसांना बळाचा अवलंब करावा लागला. यामुळे शेकडो आंदोलनकर्ते ठार झाले आहेत. नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने 8 ऑगस्ट रोजी मुख्य सल्लागार (पंतप्रधानांच्या बरोबरीने) पदाचा कार्यभार स्वीकारला. युनूस सरकारच्या अंतर्गत हसीनाविरूद्ध हा पहिला खटला आहे. त्‍यांच्‍याबरोबर बांगलादेशचे माजी गृहमंत्री असदुज्जमन खान कमाल आणि अवामी लीगचे सरचिटणीस ओबेदुल कादर, माजी पोलिस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल-मामून, माजी गोपनीय विभाग प्रमुख हारुन ओर रशीद, माजी डीएमपी आयुक्त हबीबुर रहमान आणि माजी डीएमपी सह आयुक्त बिप्लब कुमार सरकार यांच्‍याावरही खुनाचा गुन्‍हा दाखल झाला आहे. मोहम्मदपूरचा रहिवासी अमीर हमजा शातील याने ढाका महानगर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली. यानंतर शेख हसीना यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. बांगला देशमध्‍ये सलग 15 वर्ष सत्तेत असलेल्‍या शेख हसीना यांच्या सरकारवर मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. शेख हसीना यांनी बांगलादेश पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्‍याचे लष्‍कराने जाहीर केले. यानंतर नोबेल शांतता पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांनी काळजीवाहू सरकारचे नेतृत्व करावे या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या. युनूस मागील आठवड्यात फ्रान्सहून परतले. यानंतर त्‍यांनी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून शपथ घेतली आहे.

Exit mobile version