कर्जत तालुका सर्वशाखीय ब्राह्मण सभेची मागणी
। कर्जत । प्रतिनिधी ।
विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी कर्जत तालुका सर्वशाखीय ब्राह्मण सभेच्यावतीने करण्यात आली आहे. कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांची कर्जत तालुका सर्वशाखीय ब्राह्मण सभेचे महेश वैद्य, दीपक वैद्य, सुयोग फडके, विजयकुमार धारप, हितेश ठोसर, सतीश मुसळे, विशाल जोशी, संतोष वैद्य, संजीव दातार, प्रवीण गांगल, समीर सोहनी, अभिजित मराठे आदींनी भेट घेवून त्यांना निवेदन सादर केले.
सदर निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी दि.21 एप्रिल 2022 रोजी सांगली येथे पक्षीय कार्यक्रमात हिंदू विवाह व्यवस्था, कन्यादान अशा अनेक विषयांवर टिंगल-टवाळी केली. वास्तविक पाहता विवाह आणि कन्यादान यामध्ये हिंदू समाजात पवित्र असा अर्थ आहे, आपल्या जिवाभावाची कन्या दुसर्याकडे दुसर्या घरात सुपूर्त करताना केलेला एक संस्कार आहे, आपल्यापैकी अनेकांच्या विवाह तो संस्कार घडत आहे, अनेक वर्ष सातत्याने ब्राह्मण समाज व हिंदू संस्कृती अनेक प्रथा, परंपरा यांच्याबाबत टिंगल-टवाळी करून हिंदू समाजाचा अपमान करीत आहे, यामुळे हिंदू समाज तसेच ब्राह्मण समाजाचा अपमान झाला आहे. समाजांमध्ये वातावरण बिघडवणार्या समाजकंटकावर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे कर्जत तालुका सर्व शाखीय ब्राह्मण सभेच्यावतीने करण्यात आली आहे.







