कृषीवल हळदीकुंकू समारंभाला 31 वर्षांची उज्ज्वल परंपरा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील महिलांच्या सन्मानाचा, सौभाग्याचा आणि एकोप्याचा प्रतीक ठरलेला कृषीवल हळदीकुंकू समारंभ यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, शुक्रवार, दिनांक 16 जानेवारी रोजी सायंकाळी 4 ते 7 या वेळेत अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृह परिसरात या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होणार आहे. सन मराठी वाहिनीतील वेगवेगळ्या मालिकांमधील सिनेतारकांची उपस्थिती हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.
मकरसंक्रांतीच्या पावन पर्वावर गेल्या 31 वर्षांपासून महिलांचा सन्मान जपणारी ही परंपरा कृषीवल संस्थेमार्फत सातत्याने जपली जात आहे. कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हा उपक्रम आज केवळ कार्यक्रम न राहता, महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरला आहे. घर, कुटुंब, जबाबदाऱ्या आणि धावपळीच्या जीवनात सतत गुंतलेल्या महिलांना क्षणभर स्वतःसाठी जगता यावे, व्यक्त होता यावे, आनंद साजरा करता यावा, याच उद्देशाने हा हळदीकुंकू समारंभ आयोजित केला जातो. म्हणूनच हा दिवस अनेक महिलांसाठी वर्षातील सर्वांत मानाचा आणि जिव्हाळ्याचा ठरतो.
ग्रामीण आणि शहरी भागातून येणाऱ्या महिलांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी भव्य, सुसज्ज मंडप, योग्य आसन व्यवस्था आणि सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असून, महिलांसाठी हा सोहळा खऱ्या अर्थाने आनंदाची पर्वणी ठरणार आहे. महिलांच्या हक्काचा, सन्मानाचा आणि सौभाग्याचा गौरव करणारा कृषीवल हळदीकुंकू समारंभ यंदाही अलिबागच्या सामाजिक जीवनात एक अविस्मरणीय ठसा उमटवेल, यात शंका नाही.
कलाकार साधणार संवाद
यंदाच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सन मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांमधील कलाकारांची उपस्थिती. ‘हुकुमाची राणी' मालिकेतील वैभवी चव्हाण (राणी), अक्षय पाटील (इंद्र),‘इन्स्पेक्टर मंजू' मालिकेतील मोनिका राठी (मंजू), वैभव कदम (सत्या) तसेच ‘तू अनोळखी तरी सोबती' मालिकेतील योगिता चव्हाण (अर्पिता) आणि अंबर गणपुले (समीर) हे कलाकार उपस्थित राहून महिलांशी संवाद साधणार आहेत.






