। चौल । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील चौल परिसरात घरफोड्यांमध्ये वाढ झाली असून, गेल्या पंधरा दिवसांत आठ-दहा ठिकाणी बंद घरे फोडण्यात आल्याचे समोर आले आहे. यामध्ये हजारो रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. रेवदंडा पोलिसांसमोर अज्ञात चोरट्यांना पकडण्याचे आव्हान असून, पोलीस चोरांच्या शोधात आहेत.
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या घटनांत वाढ होत असून, अनेक ठिकाणी कुलूपबंद असलेली घरे फोडून चोरट्यांनी हात साफ केले आहेत. चौल पाझर येथील चंद्रसेन पोवळे यांच्या घरात चोरी झाली असून, चोरट्यांनी घरातील नळ, गॅस शेगडी, फॅन आदी साहित्यावर डल्ला मारला आहे. त्याआधी वरंडे पाडा येथील विलास शिवलकर यांचे घर बंद घर फोडून नळ व इतर साहित्याची चोरी केली आहे. तसेच काहींचे बोअरवेलमधील मशीनदेखील चोरी करण्यात आली आहे. परंतु, अद्याप या चोरट्यांचा थांगपत्ता पोलिसांना लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चौल परिसरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. लवकरात लवकर चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे. दोन महिन्यांपूर्वीच रेवदंडा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक देवानंद मुपडे यांच्यासमोर या चोरीच्या घटनांचा छडा लावण्याचे आव्हान आहे.