समाजविघातक हालचालींवर राहणार नजर

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील सुरक्षेसह राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यात प्रशासनाकडून कडक नियमावली लागू केली आहे. या नियमावलीच्या अधारे जिल्ह्यातील समाजविघातक व्यक्ती आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मंडळींच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. जिल्ह्यातील हॉटेल्स, कॉटेजेस, बंगले भाड्याने देणाऱ्यांकडून भाडेकरुंची सर्व माहिती संकलित केली जाणार आहे.

रायगड जिल्हा पर्यटनासह औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यामध्ये दोन हजारांहून अधिक कारखाने, कंपन्या असून, दोन हजारांहून अधिक हॉटेल्स, कॉटेजेस, बंगले, होमस्टे आहेत. जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, काशीद, वरसोली, किहीम, रेवदंडा, नागाव, श्रीवर्धन, दिवेआगर या समुद्रकिनाऱ्यांना पर्यटकांकडून कायमच पसंती दर्शविली जाते. जिल्ह्याला 240 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्रकिनाऱ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी वॉच टॉवर्स उभे करण्यात आले आहेत. दीडशेहून अधिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंदर, किनारे व पोर्ट परिसरात बसविण्यात आले आहेत. परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्याचे काम केले जात आहे.

रायगड जिल्हा हे प्रमुख पर्यटन क्षेत्र आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक वास्तव्य करण्यासाठी येत असतात. नोकरी-व्यवसायासाठी वेगवेगळ्या प्रांतातून येणाऱ्यांची संख्याही प्रचंड आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांच्या निवासासाठी अनेक होमस्टे, लॉजेस, स्टे रूम, बंगले व बेड अँड ब्रेकफास्ट सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, काही समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्ती, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली मंडळी, काही परदेशी नागरिक निर्जन अथवा दुर्गम ठिकाणी निवासस्थळांचा वापर करतात. त्यामुळे बेकायदेशीर कृत्ये, अवैध व्यवसाय, राष्ट्रविरोधी अथवा समाजविघातक हालचाली घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रायगड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था तसेच राष्ट्रीय सुरक्षा अबाधित राहावी यासाठी रायगड पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. एखाद्या व्यक्तीला घर अथवा हॉटेल, बंगला भाड्याने देताना मालकाने त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती घेणे बंधनकारक राहणार आहे. त्या व्यक्तीच्या ओळखपत्राची प्रत घेणे आवश्यक आहे. ही माहिती गेस्ट रजिस्टर, ऑनलाइन लॉगबुक किंवा डिजिटल स्वरूपात नोंदविणे आवश्यक आहे. रजिस्टर किमान दोन वर्षे जतन करणे, पोलिसांना तपासणीसाठी तात्काळ उपलब्ध करून देणे. सर्व होमस्टे, लॉजेस, स्टे रूम, बंगले व बेड अँड ब्रेकफास्ट आस्थापनांमध्ये प्रवेशद्वार, रिसेप्शन, कॉरिडॉर, स्विमिंग पूल व पार्किंग परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक असणार आहे.

राष्ट्रीय व सार्वजनिक सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना म्हणून हॉटेल अन्य ठिकाणी, परिसरात कोणतेही शस्त्र, स्फोटके, अंमली पदार्थ अथवा इतर बेकायदेशीर वस्तू आणण्यास मनाई असल्याचे स्पष्ट फलक लावणे. होमस्टे, लॉजेस, स्टे रूम, बंगले व बेड अँड ब्रेकफास्ट आस्थापनांचे मॅपिंग संबंधित नगरपरिषद मुख्याधिकारी, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांच्या सहकार्याने करण्यात येईल. मॅपिंगनंतरची संपूर्ण माहिती ग्रामसेवक, मुख्याधिकारी, संबंधित पोलीस ठाणे व तहसील कार्यालय येथे जमा करावी.

Exit mobile version