। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
लोकलमधील महिलांच्या डब्यात चढलेल्या एका व्यक्तीला महिलांनी हटकल्याने सदर व्यक्तीने 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला धावत्या लोकलमधून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.18) सकाळी पनवेल ते खांदेश्वर रेल्वे स्थानकादरम्यान घडली. या घटनेत सदर तरुणी जखमी झाली आहे. रेल्वे पोलिसांनी या घटनेतील आरोपी व्यक्तीला तत्काळ स्थानकात खांदेश्वर रेल्वे प्रवाशांच्या मदतीने अटक केली आहे.
या घटनेतील जखमी झालेल्या तरुणीचे नाव श्वेता संजय महाडीक असे असून ती नवीन पनवेलला राहते. ही तरुणी खारघर येथील सरस्वती इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. गुरुवारी सकाळी श्वेताने कॉलेजमध्ये जाण्यासाठी 7.59 ची पनवेल-सीसएमटी लोकल पकडली होती. यावेळी तिच्यासोबत तिची मैत्रीण होती. यावेळी महिलांच्या डब्यात शेख अख्तर नवाज हा चढला.
महिला प्रवाशांनी त्याला जाब विचारला असता, त्याचा वाद झाला. याच रागाच्या भरात त्याने धावत्या लोकलमधून श्वेताला अचानक पाठून जोराचा धक्का दिला. यामुळे श्वेता धावत्या लोकलमधून खाली रेल्वे रुळावर पडली. सुदैवाने तिचा जीव वाचला. मात्र तिच्या डोक्याला, कंबरेला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे. श्वेताने रेल्वे रुळावर काम करणाऱ्या कामगारांच्या मदतीने वडिलांना संपर्क साधुन घडल्याप्रकाराची माहिती दिली. त्यानंतर वडिलांच्या मदतीने श्वेताने रुग्णालय गाठले.
दरम्यान, आरोपीने खांदेश्वर रेल्वे स्थानकातून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र डब्यातील महिला प्रवाशांनी घटना घडल्यानंतर तत्काळ रेल्वे पोलिसांना घडल्या प्रकाराची माहिती दिली असल्याने रेल्वे पोलिसांनी तत्परता दाखवत प्रवाशांच्या मदतीने त्याला खांदेश्वर स्थानकात ताब्यात घेतले. त्यानंतर पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शेख हा फिरस्ता असून त्याचे कोणीही नातेवाईक नाहीत. प्राथमिक तपासात त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याचे आढळले असून, त्यातूनच त्याने हे कृत्य केल्याची शक्यता आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिली. दरम्यान, या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.







