लोकसहभागातून परिसराची स्वच्छता
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील महाजने ग्रामस्थांनी लोकसहभागातून अलिबाग-बेलोशी मार्गावर पडलेले खड्डे बुजविणे, रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत झुडपे काढणे, परिसराची स्वच्छता करणे तसेच गणेशमुर्ती विसर्जन घाट तयार करण्याचे काम केले आहे. या स्तुत्य उपक्रमात ग्रामस्थ, महिला व तरुण मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी नोकरी निमित्त मुंबईत राहणाऱ्या मंडळींनीदेखील योगदान दिल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. यावेळी हातात फावडे, टिकाव, कोयते, घमेल घेऊन सर्व ग्रामस्थ, महिला एकत्र आले होते.
तालुक्यातील महाजने येथील ग्रामस्थ व महिला मंडळ एकत्र येऊन कायमच लोकसहभागातून समाजोपयोगी काम करीत आले आहेत. येत्या 7 सप्टेंबरला गणरायाचे आगमन होणार असून अवघे सहा दिवसच शिल्लक राहिले आहेत. महाजने-बेलोशी रस्त्यावर पडलेल्या खड्डयांची दुरुस्ती करण्यास जिल्हा परिषद बांधकाम विभाग अपयशी ठरल्याने ग्रामस्थांनी पुढाकार घेत शनिवारी (दि.31) सकाळी लोकसहभागातून रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत, झुडूप देखील काढून परिसर स्वच्छ करण्यात आला.
तसेच, महाजने गावानजीक असलेल्या नदीमध्ये दरवर्षी गणेशमुर्तींचे विसर्जन केले जाते. ग्रामस्थांनी शासनाच्या एक पाऊल पुढे टाकत लोकसहभागातून विसर्जन घाट तयार करण्याचे काम सुरु केले. गावांतील पुरुष, महिला, तरुण मंडळी सर्वांनी मदतीचा हात देत विसर्जन घाटाचे काम करण्यात आले. यामध्ये मुंबईत नोकरीला असलेल्या मंडळींकडून उपयोगी वस्तू, सिमेेंट, रेती, खडी आदी साहित्यांच्या रुपात मदत करण्यात आली. गावातील या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतूक करण्यात येत आहे.
महिलांचाही सिंहाचा वाटा
महाजने ग्रामस्थ मंडळामार्फत दरवर्षी गणेशोत्सवापुर्वी स्वच्छता मोहिम राबविले जाते. ही परंपरा त्यांनी कायमच जपली आहे. लोकसहभागासह लोकवर्गणीतून वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला जात आहे.या उपक्रमात महिलांचादेखील सिंहाचा वाटा राहिला आहे. पुरुषांच्या बरोबरीने त्यादेखील श्रमदान करतात.