पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार; रावढळ येथे वनराई बंधाऱ्यांची निर्मिती
| महाड | सुजित धाडवे |
सध्या उन्हाळा वाढत चालला असून मानव जातीपासून सर्वच सजीव जीवांना या कडक उन्हाचा त्रास जाणवू लागला आहे. माणसाबरोबर पाळीव व वन्य प्राण्यांना सुद्धा उन्हाचे चटके सोसावे लागत असून, अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यातच ज्या ठिकाणी पाण्याचे स्रोत उपलब्ध आहेत ते जतन करून ठेवणे काळाची गरज वाटू लागली आहे. त्यामुळे ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही संकल्पना लक्षात घेऊन महाड तालुक्यातील रावढळ गावातील रेशीम बंधू परिवार सामाजिक विकास संस्थेने लोकसहभागाच्या श्रमदानातून 3 वनराई बंधारे बांधले आहेत. या लोकोपयोगी कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संस्थेच्या सदस्यांनी रविवारी (दि.9) सकाळी 7 वाजताच्या सुमारास एकत्र येत रावढळ गावाच्या बाजूला असणाऱ्या नागेश्वरी नदी पूर्वेकडील जंगलातून वाहणाऱ्या ओहोळावर श्रमदानातून बंधारा बांधण्याच्या कामाला सुरुवात केली होती. सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांनी सुमारे तीन ते साडेतीन फूट लांबीचा वनराई बंधाऱ्याची बांधणी केली. हे बंधारे सिमेंटच्या पिशव्यामधून माती, वाळू भरून खाली दगडाच्या साहाय्याने यशस्वीरितीने बांधण्यात आले. त्यामुळे जंगलातून वाहणारे हजारो लिटर पाण्याचा साठा बंधाऱ्यात होणार आहे. यर वनराई बंधाऱ्यात एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पाण्याचा साठा शिल्लक राहणार असल्याने जंगलातील वन्यप्राणी, पक्षी आणि गावातील पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष शिवाजी रेशीम यांनी सांगितले. यावेळी रेशीम बंधू परिवार सामाजिक विकास संस्थेचे कार्याध्यक्ष राजू रेशीम, अध्यक्ष शिवाजी रेशीम, सल्लागार दत्ताराम रेशीम, अनंत रेशीम, ज्ञानदेव रेशीम, परेश् रेशीम, नंदकुमार रेशीम, अमित रेशीम, अनिकेत रेशीम, अजिंक्य रेशीम, प्रणय रेशीम व प्रसाद रेशीम आदी सदस्यांनी मेहनत घेतली.
उन्हाळ्याची चाहूल लागताच पाण्याचे स्त्रोत तळ गाठतात. त्यामुळे वनराई बंधारे शेतकऱ्यांसह पशु-पक्ष्यांसाठी वरदान ठरतील. वाहत्या पाण्याच्या ठिकाणी सिमेंटच्या गोणींमध्ये माती भरुन बंधाऱ्यांची निर्मिती केली तर पाण्याच्या पातळीत वाढ होऊन त्यातून पुढील अनेक दिवस गुराढोरांची तहान भागविली जाईल. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना देखील सोयीचे होऊन त्यातून चांगली पीके घेता येतील.
अनंत रेशीम,
स्थानिक शिक्षक







