बसस्थानकाविना प्रवाशी रस्त्यावर

| दिघी | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील बसस्थानक पावसाळीपूर्वी होईल व आम्हा प्रवाशांना शासनाकडून एक सुसज्ज निवारा शेडचा आधार मिळेल असा जनसामान्यांमध्ये अशावाद निर्माण झाला होता. मात्र, प्रस्तावित बसस्थानकाचा प्रश्न अजून श्रेय वादामुळे सुटला नसल्याने दुसऱ्या वर्षी देखील भर पावसात प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. शहारातील बाजारपेठेत खरेदीसाठी, तर पर्यटनासाठी मुंबई, पुणे, सातारा येथून येणाऱ्या एसटी प्रवाशांची मोठी रेलचेल आहे. त्याचा अंदाज देखील बांधता येईना अशी स्थिती आहे. यासोबतच नेहमीच प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसह वयोवृध्दांना देखील बसस्थानकाविना पावसाळ्यात मोठे दिव्य पार करावे लागत आहे.

तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी बोर्लीपंचतन येथे बसस्थानक सारख्या अत्यावश्यक गरजा नसल्याबाबत प्रवाशांनी खंत व्यक्त केली. अनेक सुविधा मिळणाऱ्या शहराला दोन वर्ष उलटूनही एक निवारा शेडचा प्रश्न सुटला नाही. बसस्थानकाची इमारत लोकवर्गणीतून उभी करण्याची ग्रामस्थांची तयारी असताना, स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने हा प्रश्न आजमितीस अनुत्तरित आहे.
गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून बसस्थानकाची इमारत उभी करण्याचे ठरवले आहे. मात्र, त्यांनाही श्रेय वादातून रोखले जात आहे. परिणामी प्रवाशांना मिळणाऱ्या सुसज्ज निवारा शेड व सुलभ शौचालय या सारख्या सुविधांच्या गैरसोईमुळे अनेक स्थानिक व पर्यटक विशेषतः महिलांची कुचबंना होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

Exit mobile version