भात पिकाची स्पर्धाक्षम मुल्यसाखळी विकसित करावी- दशरथ तांबाळे

| नेरळ | प्रतिनिधी |

भातपिकाचे स्पर्धात्मक मूल्यमापन करण्यासाठी शेतकर्‍यांनी भाताच्या वाणाची मूल्य साखळी विकसित करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या आत्मा विभाग संचालक दशरथ तांबाळे यांनी केले. शेतकरी उत्पादक कंपनी, पुरवठादार, कृषी शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांची परिषद मध्ये तांबाळे बोलत होते.

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत विभागीय अंमलबजावणी कक्ष कोकण विभाग ठाणे कार्यालयाच्या वतीने एकदिवसीय भात पिकावर आधारित विभागस्तरीय उत्पादन तंत्रज्ञान आणि बाजार संमेलनाचे आयोजन प्रादेशिक भात संशोधन केंद्र कर्जत येथे करण्यात आले. कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील स्मार्ट प्रकल्पामध्ये सहभागी शेतकरी असलेले उत्पादक कंपनी, निविष्ठा पुरवठाधारक, कृषी विद्यापीठ आणि संशोधन केंद्र शास्त्रज्ञ, प्रक्रियादार – निर्यातदार, तंत्रज्ञान पुरवठादार प्रतिनिधी सहभागी झाले होते. या परिषदेत मूल्यसाखळीतील अडचणी आणि उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली.

या परिषदेत सहभागी सर्व प्रतिनिधी यांनी आपल्या घटकांमधील अडचणी आणि समस्या यावर विभागीय तसेच जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्षाकडून दखल घेण्यात आली. त्याचवेळी तांत्रिक आणि धोरणात्मक अडचणी सोडवण्यासाठी निश्‍चितच प्रयत्न करण्यात येतील असे आश्‍वासन देण्यात आले. शेती विकासासाठी मुल्यसाखळीचे महत्व या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करत भात पिकाची स्पर्धाक्षम मुल्यसाखळी विकसित करावी असे आवाहन तांबाळे यांनी केले.

यावेळी विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे अंकुश माने,पणन मंडळ मुंबई डॉ. भास्कर पाटील, संशोधन संचालक कृषी संशोधन केंद्र कर्जत एस. बी. भगत, डी.डी.एम. नाबार्ड अपसुंदे यांनी मार्गदर्शन केले. लाभार्थ्यांनी स्मार्ट सारख्या प्रकल्पातून केवळ आर्थिक अनुदान मिळवण्यापेक्षा त्यातून शाश्‍वत उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावे असे सूचित करण्यात आले. कोकण विभागात स्मार्ट प्रकल्पाला गती देऊन भात पिकाच्या आदर्श मूल्य साखळी विकसित कराव्यात असे उपस्थितांना अंकुश माने यांनी आवाहन केले. समुदाय आधारित संस्था प्रतिनिधींसाठी राज्यांतर्गत प्रशिक्षणासह अभ्यास दौर्‍याबाबत चर्चा करण्यात आली. कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ यांचेशी चर्चा करून पुढील हंगामात राबवावयाच्या प्रस्तावित मूल्यसाखळीची रूपरेषा ठरविण्यात आली. तृप्ती वाघमोडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना तर रामेश्‍वर पाचे यांनी स्मार्ट प्रकल्पाबाबत सादरीकरण केले. सूत्रसंचालन दिपाली जोशी यांनी केले.

स्मार्ट प्रकल्प हा शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असून लाभार्थ्यांनी प्रकल्पातून केवळ आर्थिक अनुदान मिळवण्यापेक्षा त्यातून शाश्‍वत उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावे व भात पिकाच्या आदर्श मूल्य साखळी विकसित कराव्यात.

अंकुश माने- प्रमुख, कोकण विभाग
Exit mobile version