| रोहा | प्रतिनिधी |
आईच्या निधनानंतर घरातील मंडळीने एका नाल्याजवळ टाकून दिलेले टाकाऊ कपडे, कागद, पिशव्या व अन्य टाकाऊ साहित्य पडले होते. या दरम्यान शाळकरी मुलांनी सर्व चीजवस्तू बघितल्यानंतर नाल्यालगत सोन्याने भरलेले 4 हंडे सापडल्याची अफवा सर्वत्र पसरली. सदर घटना पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. टाकाऊ साहित्य ताब्यात घेतल्यानंतर चिट्टीत सदर व्यक्तीचे नाव आणि 10 तोळे सोन्याचे दागिने सापडले. पोलिसांनी संबधित व्यक्तींना बोलावून दागिने त्यांच्या ताब्यात दिले. अशा पद्धतीने चार सोन्याचे हंड्यांच्या अफवेला अखेर पूर्णविराम लागला. आणि साऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
तालुक्यातील वरसे येथील अनंत दगडू पवार व त्यांची बहीण शीतल पवार यांची आई निर्मला पवार यांचे हृदयविकाराने निधन झाल्यानंतर घरातील काही साहित्य नकळतपणे नाल्यात टाकण्यात आले होते. या दरम्यान परिसरात खेळणाऱ्या काही मुलांना नाल्यात पडलेले साहित्य संशयास्पद वाटल्याने नागरिकांनी तात्काळ ही बाब पोलीसांच्या निदर्शनास आणून दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे 10 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आढळून आले. दागिन्यांमध्ये घरचा पत्ता व नावाची ओळख सापडल्याने पोलिसांनी संबंधित कुटुंबाचा शोध घेऊन चौकशी केली. खात्री झाल्यानंतर सदरचे मौल्यवान दागिने रविवारी (दि.22) आनंद पवार व शीतल पवार यांना सुपूर्द करण्यात आले. या प्रकरणात मुलांची जागरूकता आणि पोलिसांची तत्पर कार्यवाही दिसून आल्याने पवार कुटूंबीयांचे मोठे नुकसान टळले असून, दागिने परत मिळाल्याने पवार कुटुंबीयांनी रोहा पोलिसांचे आभार मानले.







