| पनवेल | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्वच बसस्थानक परिसरात दर 15 दिवसांनी सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांना अधिक स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी सुविधा मिळाव्यात, तसेच एसटीची सकारात्मक प्रतिमा अधिक बळकट करण्याचा प्रयत्न यामधून केला जाणार आहे.
परिवहन खात्याचा पदभार प्रताप सरनाईक यांनी घेतल्यापासून अचानक भेटी देऊन बसस्थानकांची ते पाहणी करतात. त्यातून बसस्थानकात काही चुकीचे आढळले, अस्वच्छता आढळली तर अधिकाऱ्यांना धारेवर धरले जात आहे. त्यानुसार एसटी महामंडळाच्या मोहिमेंतर्गत बसस्थानकातील विविध विभागांतील स्वच्छता दर 15 दिवसांनी करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी स्वच्छता व नियमित देखभाल ठेवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. वास्तविक पाहता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक स्पर्धेत स्वच्छतेला गुण दिले होते. यामध्ये स्वच्छतागृहाची स्वच्छता कितपत राखली जाते, यालाही गुण असल्याने विशेष लक्ष दिले जात होते. बसस्थानकात एकाच वेळी लाखो प्रवासी आलेले असतात. त्यामुळे कितीही इच्छा असली तरी स्वच्छता राखणे अवघड होत असते, पण ते राखण्याची खबरदारी घेतली जाणार आहे.







