मीनाक्षी पाटीलांची वकृत्वाची ख्याती महाराष्ट्रात- सखाराम पवार

। अलिबाग । प्रतिनिधी ।

मीनाक्षी पाटील यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीने संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण केली. राजकीय, सामाजिक, पत्रकारीता व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा एक वेगळा दबदबा होता. दहा हजारामध्ये एक असलेल्या वक्त्या म्हणून त्या होत्या. त्यांच्या वकृत्वाची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात आजही आहे. मीनाक्षी पाटील यांच्या निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे असे प्रतिपादन स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतिक कलामंचे अध्यक्ष सखाराम पवार यांनी गुरुवारी (दि.04) रोजी केले. माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्या निधनानिमित्त रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतिक कला मंचच्या वतीने रामनारायण पत्रकार भवनमध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस संजय खांबेटे, उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर, अलिबागचे माजी नगराध्यक्ष सतिश प्रधान, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती अनिल पाटील, अ‍ॅड. वैभव भोळे, भारत रांजणकर, रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे संजय बोंदार्डे, बी. जी. पाटील, दिपक पाटील, हर्षद घरत, माजी नगरसेवक आर. के. घरत, नंदु तळकर, वैशाली भिडे, विनोद टेंबूलकर, सुरेश म्हात्रे, चारुशिला कोरडे, रोहन पाटील, राजाराम भगत, ज्योती म्हात्रे, झेबा कुरेशी आदींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

याप्रसंगी सखाराम पवार म्हणाले की, नारायण नागू पाटील, प्रभाकर पाटील यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे काम मीनाक्षी पाटील यांनी खंबीरपणे सांभाळले आहे. समाजकारण करीत असताना राजकारणातदेखील त्यांची एक वेगळी पक्कड होती. त्यांना वाचनाची फार आवड होती. अभ्यासू व्यक्तीमत्व होते. गेली अनेक वर्ष त्यांनी पत्रकार म्हणून काम करीत असताना पत्रकारांच्या प्रश्‍नांबाबत लढा देखील दिला. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी धुरा सक्षमपणे सांभाळली. त्यांच्या कार्याची माहिती देत जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. यावेळी अनेक मान्यवरांनीदेखील शोक व्यक्त केले.

अलिबागमधील रामनारायण पत्रकार भवनमध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते मीनाक्षी पाटील याच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी उभे राहून श्रध्दांजली अर्पण केली.

मीनाक्षी पाटील यांना अभिवादन
Exit mobile version