आर्थिक लोभापायी ठेकेदारांची पाठराखण?

| माथेरान | प्रतिनिधी |

माथेरानला काही महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मागील दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, मलनिस्सारण प्रकल्पासारखी महत्वपूर्ण कामे मुदतीत पूर्ण होत नसून, या काही भागातील ही कामे निकृष्ठ दर्जाची होत असतानही प्रशासनाने ठेकेदारांना करोडो रुपयांची बिले अदा केली आहेत. त्यामुळे स्थानिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, प्रशासनाने ठेकेदारांचे लांगुलचालन बंद करावे, अशी मागणी स्थानिक करत आहेत. त्याचप्रमाणे शारलोट तलावातील गाळ काढणे आणि अन्य कामांसाठी जवळपास 5 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. परंतु, त्यातील काही गाळ काढला असला, तरी मुख्य तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ शिल्लक आहे. तरी देखील संबंधित ठेकेदारांना मोठ्या रकमेची बिले अदा करण्यात आल्याचे बोलले जात आहे. निविदेत नमूद केल्याप्रमाणे तलावातील संपूर्ण गाळ काढणे अनिवार्य असताना देखील गाळ तसाच राहिल्याने पाण्याचा तुटवडा भासत आहे. याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागविली असता, पालिका प्रशासनाच्यावतीने सहायक रचनाकार करुणा बांगर यांनी काही महत्वपूर्ण कारणास्तव ठेकेदाराच्या बाजूने मोगम उत्तर देऊन वेळ मारून नेली आहे. त्यामुळे या कामांची चौकशी होणार ही बाब लक्षात येताच करुणा बांगर यांनी आपली बदली अन्य ठिकाणी करून घेतल्याचे बोलले जात आहे. या कामात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचे स्वतः सत्तेतील नगरसेवकच बोलू लागल्याने यामध्ये काहीतरी तथ्य असणार, अशी कुजबुज वेगाने सुरू झाली आहे.

Exit mobile version