| वेणगाव | प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील भीमाशंकर अभयारण्याच्या पायथ्याशी असणाऱ्या टेंबरे गावातील शेतकऱ्यांच्या गुरांवर गुरवारी बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात एक गाईचे वासरू ठार मारले गेले.
टेंबरे येथील हरिचंद्र धर्मा निलदे यांच्याकडे चार गाई, दोन बैल, दोन वासरे अशी गुरे आहेत. गुरुवारी (दि.२०) सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी आपली गुरे गावाशेजारी असणाऱ्या रानात चरण्यासाठी सोडली. त्यानंतर दुपारच्या सुमारास गुरांवर बिबट्या वाघाने अचानक हल्ला केला. त्या हल्ल्यात हरिश्चंद्र दिलदे यांच्या गाईचे वासरू ठार मारले गेले.
याबाबत हरिश्चंद्र निलदे यांना समजताच जंगलात जाऊन त्यांनी पाहणी केली असता त्यांच्याच एका गाईचे वासरू बिबट्या वाघाने मारलेले दिसले. त्यांनी तात्काळ याची माहिती वनविभागाला दिली. त्यानुसार शुक्रवारी वनविभागाचे कर्मचारी येऊन बिबट्याच्या हल्ल्यात ठार मारलेल्या गाईच्या वासरचा पंचनामा केला.
मागील दोन महिन्यापूर्वीही हरिश्चंद्र निलदे यांच्या दुसऱ्या एका गाईच्या वासराला बिबट्याने मारले होते. हरिश्चंद्र निलदे यांची दोन गाईची वासरे मारल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
भीमाशंकर अभयारण्याच्या डोंगरालगत पायथ्याशी असणारे पेठ, आंबिवली, जांबरुख, शिंगढोळ, रजपे, धामणी आदी ठिकाणी बिबट्याचा वास्तव असून तेथील ग्रामस्थांनी बिबट्याला पाहिले असल्याचे बोलले जात आहे.
सद्या बिबट्या या प्राण्यांचा प्रजननाचा मौसम चालू आहे. ग्रामस्थांनी कोणीही रात्रीच्या वेळेस एकटे फिरू नये, आपल्या मुलांना एकटे सोडू नये. तसेच आपल्या जवळील पाळीव पशूंना मोकळे न ठेवता रात्रीच्या वेळेस बंदिस्त जागेत ठेवून सतर्क राहण्याचा ईशारा यावेळी वनविभागाकडून देण्यात आला आहे.
– समीर शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्जत पूर्व







