अणुस्कुरा घाटात दरड कोसळी

| राजापूर | वृत्तसंस्था |

राजापूर तालुक्यात पावसाची रिमझिम सुरू असताना पश्चिम महाराष्ट्राशी रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात दरड कोसळण्याची घटना गुरुवारी दि.13 सायंकाळी 6.30 च्या सुमारास घडली.

दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. दरड कोसळण्याची यावर्षीची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे घाटातील सुरक्षित प्रवासासह घाटाच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. दरम्यान, घाटातील रस्त्यात सायंकाळी कोसळलेली दरड आणि माती काढून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्काळ प्रयत्न सुरू करण्यात आले. यामुळे लवकरच रस्ता वाहतुकीसाठी मोकळा होण्याचे सकारात्मक चिन्ह दिसत होते. गत आठवड्यात माॅन्सून सक्रिय झाला असून तेव्हापासून तालुक्यामध्ये कमी-जास्त प्रमाणात पडत आहे. आज तालुक्यामध्ये दिवसभर पावसाचा जोर होता. यामध्ये दगड आणि मोठ्या प्रमाणात माती रस्त्यावर आल्याने घाटरस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. या अणुस्कुरा घाट मार्गद्वारे कोकणाला पश्चिम महाराष्ट्राला जोडले गेले आहे. कोकणामध्ये ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून या घटमार्गाची ओळख आहे. त्यामुळे या मार्गाने वाहनांची नेहमीच मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

Exit mobile version