सुकेळी खिंडीत दरड कोसळली

सुदैवाने जीवितहानी टळली

| कोलाड | वार्ताहर |

गेल्या सात दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंडीत शनिवार, दि.22 रोजी मध्यरात्री दरड कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी अथवा आर्थिक नुकसान झाले नाही.

सुकेळी खिंडीत तीन ते चार ठिकाणी डोंगरावरील माती मोठमोठे दगड गोठे, झाडे झुडपे रस्त्यावर आली असून, पाऊस जर असाच सुरु राहिला तर अशीच मोठी दरड कोसळून रस्त्यावर येऊन या महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होईल. महामार्गावरील पळस्पे ते इंदापूरदरम्यान चौपदरीकरणासाठी सुकेळी खिंडीत डोंगरांना खोदकाम करुन ठेवले आहे, त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या डोंगराची माती सैल झाली असून, पाऊस पडू लागला की दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी सुकेळी खिंडीत डोंगराचे खोदकाम केले असून, यामुळे डोंगराची माती सैल झाली आहे. जोरदार पाऊस पडल्यावर दरड कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. दरड कोसळून एखादी मोठी घटना घडून नाहक बळी गेला तर तर याला जबाबदार कोण?

चेतन मोहिते, सामाजिक कार्यकर्ते
Exit mobile version