किल्ले रायगडावरील वाटेवर कोसळली दरड

| महाड | वार्ताहर |

रायगड किल्ल्यावर जाणार्‍या पायवाटेवर दरड कोसळल्याने गडाचा पायरी मार्ग धोकादायक झाला आहे. दरडीमध्ये स्थानिक व्यावसायिकाच्या छोट्या दुकानाचे नुकसान झाले. या ठिकाणी पडलेले काही मोठे दगड स्थानिकांनी बाजूला केल्याने पायरी मार्ग सध्या सुरू आहे. दरम्यान सातत्याने घडणार्‍या दरडींच्या घटनांमुळे गतवर्षी पायरी मार्ग बंद करण्यात आला होता. रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी एक हजार चारशे पायर्‍या असून काही ठिकाणी सपाट पायवाट आहे. गडावर जाण्यासाठी पायरी मार्गाचा पहिला टापू चढून गेल्यानंतर लागणार्‍या सपाट पायवाटेवर दरड कोसळली. वाटेवर लहान मोठे अनेक दगड कोसळले असून एका टपरीचे नुकसान झाले आहे. रायगडावर वर्षभर शिवप्रेमी व पर्यटक येत असून दरड कोसळली त्या वेळी कोणीही पर्यटक नसल्याने मोठा अनर्थ टळला. रायगड किल्ल्यावर पायरी मार्गावर गतवर्षी दरड कोसळल्याने सोलापूर येथील एका पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर काही दिवसांतच पुन्हा चित्त दरवाजाजवळ दरड कोसळल्याने रायगडावरील मुख्य मार्गावर असणार्‍या टपर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ही घटना लक्षात घेता, प्रशासनाने तत्काळ रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग 15 जून ते 31 ऑगस्ट या कालावधीमध्ये बंद केला होता. या वर्षी देखील गडाचा मार्ग पावसाळ्यात धोकादायक झाल्याने शिवप्रेमी व पर्यटकांबरोबरच स्थानिक व्यावसायिकांची सुरक्षाही धोक्यात आली आहे.

Exit mobile version