कारवाईकडे पोलिसांचे दुर्लक्ष
| रायगड | कृषीवल टीम |
रायगड जिल्ह्यातील पनेवल, खालापूर भागात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली चालविल्या जाणाऱ्या डान्स बारच्या आडून ‘सेक्सचा बाजार’ सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश, बांगलादेश, कोलकता, पश्चिम बंगाल, मुंबई, नेपाळ, या ठिकाणांहून पैसा कमविण्यासाठी पनवेलमध्ये आलेल्या बारबालांनी इथल्या तरुणाईला चांगलीच भुरळ घातली आहे. पनवेल परिसरात रात्री उशिरापर्यत धिंगाणा सुरु असून, वेश्या व्यवसाय देखील सुरु असल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांचा या प्रकारांना पाठिंबा आहे का, असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. याविरोधात ॲड. ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडवणीस, पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र, त्या नंतरही ऑर्केस्ट्राच्या नावावर सुरु असलेल्या बारमध्ये अवैध धंदे सुरूच आहेत. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करावा, अशी मागणी ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी केली आहे.
पनवेल, खालापूरमध्ये सुरु असलेले अनधिकृत डान्स बार आणि त्यामध्ये चाललेले आक्षेपार्ह प्रकार किळसवाणे असून अनेकदा तक्रार करुनही कारवाई होत नसल्याचा आरोप. ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी केला आहे. डान्स बारमध्ये आलेला तरुण भिकेकंगाल बनतोय. त्याचा संसार अक्षरश: देशोधडीला लागतोय. नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होताच मिलिंद भारंबे यांनी परिसरातील अवैध धंद्यावर निर्बंध आणले होते. आयुक्तांनी त्यावेळी घेतलेल्या निर्णयामुळे परिसरातील अवैध धंदे काही प्रमाणात कमी झाल्याने आयुक्त भारंबे यांच्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक झाले होते. आता मात्र परस्थिती बदलली असून, अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरु झाले आहेत. आयुक्तांच्या या बदलल्या भूमिकेमुळे नवी मुंबई, पनवेल परिसरातील जनतेत रोष निर्माण झाला आहे. हे अश्लील आणि बेकायदेशीर प्रकार एक तर बंद करावेत, किंवा अधिवेशनामध्ये या प्रकारांना सर्वानुमते मान्यता देऊन हे प्रकार कायम ठेवावेत, अशी मागणी देखील ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी केली आहे.
कारवाईबाबत 'सेटिंग'?
मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे वारंवार तक्रारी दाखल करुनही कारवाई होत नसल्यामुळे खूप मोठी सेटींग असल्याचा स्पष्ट आरोप ॲड. ठाकूर यांनी केला आहे.
'या' ठिकाणी डान्सबार असल्याचा ॲड. ठाकूरांचा दावा
पनवेल- जगदंबा बार, चाणक्य बार, कपल बार, क्रेझी बॉईज बार, ग्रिट्स बार, गोल्डन नाईट, टाईम्स, गोपिका, कपल, गोल्डन डिगर, राहूल पार्क हॉटेल.
कोनगाव- टायटन, नाईट रायडर बार, चांदनी बार, मूननाईट बार, स्वामी बार, माया बार, बिनधास्त बार, आयकॉन बार, तानसा, बाँबे बार.
कळंबोली- तानसा बार, कॅप्टन बार, तारा.
तळोजा- चंद्रविलास बार, महाराष्ट्र बार, तसेच कमल पंजाब अँड महाराष्ट्र बार, निसर्ग बार.
कोन- नटराज बार (व्ही.आय.पी. रूममध्ये वेश्या व्यवसाय), साई दर्शन बार (पहिल्या मजल्यावर वेश्या व्यवसाय), वेल्वेट बार (रात्री उशीरापर्यंत वेश्या व्यवसाय).
कोपरखैरणे- बेला बार, सावली बार, रबाळे एम.आय.डी.सी. येथील संगम बार, मूड बार, सेल्फी बार, मायरा बार, विटावा बार, सूरसंगीत बार.
वाशी- कपील बार, एमएच 43 बार, किंग्ज बार, रमेश बार.
बेलापूर- मेघराज बार, कॅबाना बार, स्टार सिटी बार, स्टार नाईट बार, बेबो बार, आयकॉन बार, सिक्वेन्स बार, नाईटइंगल बार, बिग बॉस बार.
डान्स बारच्या नावाखाली मध्यरात्रीपर्यंत अश्लील धिंगाणा सुरू असतो. तर काही बारमध्ये रात्रभर हुक्का सुरू असतो. परिणामी आता याप्रकरणी अधिवेशनामध्ये हा मुद्दा घेऊन हे अश्लील प्रकार एक तर कायमचे बंद करावेत किंवा या प्रकारांना खुलेआम परवानगी द्यावी.
ॲड. काशिनाथ ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते आणि
प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस
मध्यंतरीच्या काळात स्व. आनंद दीघेंच्या जीवनावर आलेल्या सिनेमात स्वर्गीय दिघे साहेब सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बार बंद करण्याचे आदेश देतात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या आदेशाचं पालन करतात, असा भाग चित्रित करण्यात आला आहे. पनवेलमधील नागरिकांना बारमुळे होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन आपल्या राजकीय गुरूंना गुरुदक्षिणा द्यावी हे अपेक्षित आहे.
संतोष गवस, जिल्हाध्यक्ष,
प्रहार जनशक्ती पक्ष
शेकाप नेते माजी आमदार विवेकानंद पाटील यांनी पनवेलमधील बार विरोधात विधिमंडळात आवाज उचलला होता. त्यानंतर तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यात डान्स बार बंदीचा निर्णय घेतला होता. त्यावेळी शेकापचे आ. विवेकानंद पाटील यांनी घेतलेली बार बंदची भूमिका शेकापची आजची भूमिका आहे.
राजेश केणी, शेकाप नेते, पनवेल