स्थानिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत-कल्याण राज्यमार्गावर नेरळ गावातील खांडा येथे 40 वर्षे जुना लहान पुल आहे. या पुलाचा पाया खचला असल्याची माहिती काही स्थानिकांना मिळाली. त्यानंतर स्थानिकांसह नेरळ पोलिसांनी एकत्र येत त्या पुलाच्या बाजूची दुहेरी वाहतूक बंद करुन एकेरी वाहतूक सुरू केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, तरीदेखील खांडा पुलावरून जीवमुठीत घेऊनच प्रवासी वर्ग प्रवास करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
कर्जत-कल्याण राज्यमार्गावर नेरळ गावातील खांडा येथे माथेरान डोंगरातून वाहून येणाऱ्या पाण्याच्या नाल्यावर पूल बांधण्यात आला आहे. हा पुल किमान 40 वर्षे जुना असून या पुलावरून होणारी वाहतूक ही अनेक वर्षे सुरू आहे. दहा वर्षांपूर्वी या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यावर या लहान पुलाच्या बाजूला नवीन पुल बांधण्यात आला आहे. मात्र, हा पूल कोणत्याही वापराविना बंद असल्याने त्या पुलावर वाहने पार्किंग करून ठेवली जात होती. मात्र, रविवारी सायंकाळच्या सुमारास खांडा पुलाच्या एका पायाचा काही भाग कोसळून गेला होता. त्यामुळे पुलाचा संपूर्ण पाया तुटून पडण्याची शक्यता निर्माण झाली. ही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच वाहनचालकांना सतर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनतर नेरळचे उप निरीक्षक श्रीरंग किसवे हे देखील त्या ठिकाणी पोहचल आणि पुलावरून एकेरी वाहतूक सुरू केली. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी त्या ठिकाणी आला नसल्याने स्थानिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग अनभिज्ञ
खांडा पुलाचा पाया खचला असल्याची कोणतीही माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याला नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जर ही बाब स्थानिकांच्या लक्षात आली नसती तर, कदाचित मोठा अनर्थ घडला असता. त्यामुळे आतातरी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या पुलाची पाहणी करावी आणि पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी हालचाली कराव्यात, अशी मागणी गोरख शेप यांनी केली आहे. त्याचवेळी या पुलाचा पाया एका बाजूने खचल्याची माहिती मिळाल्यानंतर देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 24 तासांत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसल्याने स्थानिकांमधून नाराजीचे सुर उमटत आहेत.





