पंडित पाटील यांची प्रमुख उपस्थिती
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
ज्येष्ठ नागरिक कुर्डुस विभाग या संस्थेचा दशकपूर्ती सोहळा दिमाखदारपणे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष यशवंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी आमदार पंडित पाटील व सनदी अधिकारी संजय राऊत अलिबाग यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी सावित्रीच्या लेकींनी मान्यवरांचे औक्षण केले व दीपप्रज्ज्वलन आणि गणेश पूजनाने मांगल्यमय वातावरणात कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
संस्थेच्या वतीने मान्यवरांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. आपल्या मनोगतात पंडित पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांप्रती असलेल्या आदरापोटी आवर्जून उपस्थित राहून मौलिक मार्गदर्शन केले. ज्येष्ठांनी सुदृढ आयुष्याकरिता समतोल व पचनास हलका आहार घेणे, फिरावयास रोज जाणे, आपल्या आरोग्याची काळजी आपण स्वत:च घेणे याबाबत मार्गदर्शन केले. संस्थेचे वय वाढत जाते तशी संस्था अधिक विस्तारित, मजबूत होत असते. तर माणसाचे याच्या बरोबर उलट असते, असे प्रतिपादन संजय राऊत यांनी केले. संस्थेचे 300 सभासद हे तळगावातील असून, ते सर्वसमावेशकतेचे प्रतिक आहे. कोणतीही सामाजिक संस्था जन्मत: लक्षाधीश नसते, आपल्यासारख्यांच्या आर्थिक सहकारातून आणि योगदानातून या संस्थांचे वटवृक्षात रूपांतर होत असते. संस्थेचा कारभार अत्यंत पारदर्शक असून, संस्थेची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याचे प्रतिपादन विकास पाटील, बाळ सिंगासने, अमृत पाटील, ज.का. ठाकूर यांनी केले.
या संस्थेच्या माध्यमातून गतवर्षी 500 गरजूंची नेत्रतपासणी करण्यात येऊन 300 सामान्य गरजू, गरीब नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया रामकृष्ण मिशन हॉस्पिटल, खार मुंबई व लासन्स हेल्थ फाऊंडेशन चोंढी यांच्या संपूर्ण सहकार्याने करण्यात आल्या. याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना एस.टी.चे स्मार्ट कार्ड, ज्येष्ठांचे वाढदिवस, विवाहास 50 वर्षे पूर्ण झालेल्या दाम्पत्यांचा लग्न वाढदिवस महिलांच्या दृष्टीने धार्मिक सामाजिक उपक्रम राबवून सामाजिकता सुदृढ करण्याचा संस्थेचा प्रामाणिक प्रयत्न कौतुकास्पद आहे.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष यशवंत पाटील, उपाध्यक्ष सुभाष म्हात्रे आणि संस्थेचे माजी उपाध्यक्ष सखाराम पाटील, सचिव अशोक पाटील, खजिनदार जनार्दन पाटील, चंद्रकांत म्हात्रे, श्रीधर पाटील, प्रभाकर घरत, शामकांत पिंगळे, रामचंद्र बांधणकर, बबन पिंगळे, आर.के. पाटील, महादेव पाटील, अरविंद पाटील, विठोबा म्हात्रे आणि मान्यवर सभासदानी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबन पिंगळे यांनी केले, तर सुधाकर पिंगळे यांनी आभार मानून सोहळ्याची सांगता करण्यात आली.