नागोठण्यात गतिरोधकांची मागणी

| नागोठणे | वार्ताहर |

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेल्या नागोठणे एसटी स्थानक ते प्रथमिक आरोग्य केंद्रालगतच्या महामार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण नुकतेच करण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांचा वेग वाढला असून अपघातग्रस्त वळण असलेल्या नागोठणे वनखाते कार्यालयासमोरील रस्त्यावर तात्काळ गतिरोधक उभारावा अशी मागणी संजय महाडिक व हरिष काळे यांनी केली आहे.

शहरात येण्या-जाण्यासाठी असलेल्या या रस्त्याचे डांबरीकरण नुकतेच करण्यात आल्याने हा रस्ता गुळगुळीत झाला आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या सर्वच वाहनांचा वेग वाढला आहे. त्यातच दुचाकीस्वार तर या रस्त्यावरून भरधाव वेगाने जात आहेत. येथील वनखात्याच्या कार्यालयासमोर वळणदार रस्ता अपघातग्रस्त ठिकाण म्हणून ओळखले जाते. याच ठिकाणी कोळीवाडा येथील 30 वर्षीय सचिन मपारी याचे फेब्रुवारी 2021 मध्ये अपघातात निधन झाले होते. याच ठिकाणी कचेरी शाळेकडे जाणारा रस्ता जोडला आहे. त्यामुळे याठिकाणी गतिरोधकाची गरज आहे. याशिवाय नागोठण्याचे प्रवेशद्वार असलेल्या बँक ऑफ इंडियासमोरील रस्त्यावर अशा दोन ठिकाणी तातडीने गतिरोधक उभारण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Exit mobile version