महिला अत्याचार प्रकरणाला वेगळे वळण

| पेण | प्रतिनिधी |

पेण पोलीस ठाण्यामध्ये 6 जानेवारी पासून अमर पाटील, सुजीत पाटील आणि या दोघांच्या पत्नी यांची परस्परांविरुद्ध विधाने नमूद करून घेतली असून, तेव्हापासून यांच्यात वाद सुरू आहे. अखेर या वादाने एक वेगळेच वळण घेऊन परस्परांना जीवे मारण्यापर्यंत मजल पोहोचली आहे. त्याबाबत पेण पोलीस ठाण्यात परस्परांविरूद्ध गुन्हे दाखल झाले असले तरी बलात्काराचे आरोप झालेल्यांवर अजूनही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पेण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यातील पीडित महिलेवर आरोपी अमर पाटील याने खोपोली बायपास रोडवर गाडीमध्ये अत्याचार केला. त्यानंतर या पीडित महिलेवर तिच्या राहत्या घरात जाऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध प्रस्तापित केले. यात ती गरोदर राहिली. त्यानंतर यातील आरोपीने गर्भपात करण्यासाठी गोळ्या दिल्या. गर्भपात करून तिच्यासह मुलीला व नवऱ्याला जीवे मारण्यासह तिची बदनामी करण्याचीदेखील धमकी दिली. हा प्रकार पीडित महिलेच्या नवऱ्याला समजताच तो समजूत घालण्यासाठी आरोपी अमर याच्या घरी गेला असता, यातील पीडित महिलेला आरोपीने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. यातील आरोपीचे वडील सुरेश तथा सूर्यकांत पाटील यांनी पीडित महिलेला दम देत सांगितले की, मला तुम्ही ओळखत नाहीत, मी काहीही करू शकतो. मी वाघ आहे, तुझ्या नवऱ्याला एका गोळीत मारेन, त्याला सोडणार नाही. याबाबतची हकीकत पीडित महिलेने पेण पोलीस ठाण्यात सांगितली असून, त्यानुसार पेण पोलीस ठाण्यात अमर पाटील, त्याची पत्नी, आई व वडील सुरेश पाटील यांच्याविरुद्ध भा.दं.वि.स.क. 376, 376 (2) (एन) 354, 323, 504, 506, 34 या प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, अद्याप कुणीही आरोपी अटक नाही.

परंतु, फिर्यादी महिलेच्या पतीविरुद्ध या गुन्ह्यातील आरोपीने पेण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. यामध्ये अमर याने अशी माहिती दिली आहे की, पीडित महिलेचा पती सुजीत याने घरात घुसून शिवीगाळ केली व लोखंडी कोयत्याने डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो वार चुकल्याने तो खांद्यावर लागला. यामध्ये आपापसात धक्काबुक्की झाली. वरील हकीकतीच्या आधारे पेण पोलीस ठाण्यात भा.दं.वि.स.क. 307, 452, 323,504, 34 नुसार गुन्हा नोंद झाला असून, यातील आरोपी सुजीत पाटील यास अटक झाली आहे. सदर दोन्ही गुन्ह्यातील तपास पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

परस्पर विरोधी गुन्ह्यामध्ये फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कलम नोंदण्यात आले. परंतु, महिलेचा विनयभंग झाला आहे. त्याचप्रमाणे महिलेवर वारंवार बलात्कार झाला आहे, तसेच महिलेच्या इच्छेविरुद्ध गर्भपातदेखील झाला आहे. मात्र, महिलेच्या फिर्यादीनुसार आरोपी असलेल्यांना अटक झालेली नाही. याउलट, सुजीत पाटील हा सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने त्याला त्वरित अटक झाली, अशी चर्चा चालू आहे.

Exit mobile version