| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
थळ जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केलेली उमेदवारी ही सत्तेच्या माजाला आणि वर्षानुवर्षांच्या अपयशाला थेट आव्हान देणारी ठरत आहे. जनतेला गृहित धरून चाललेल्या राजकारणाविरुद्ध शेकापने शिक्षित, जबाबदार आणि जनतेशी नाळ जोडलेली उमेदवारी दिल्याने मतदारांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
थळ जिल्हा परिषदेसाठी कु. सानिका सुरेश घरत यांना उमेदवारी देण्यात आली असून, हा निर्णय केवळ उमेदवारी जाहीर करण्यापुरता मर्यादित नसून परिवर्तनाचा ठाम संदेश देणारा मानला जात आहे. शिक्षित, जागरूक आणि सामाजिक प्रश्नांची स्पष्ट जाण असलेली उमेदवार म्हणून सानिका घरत यांची ओळख आहे. सत्तेच्या दहशतीला न घाबरता थेट प्रश्न मांडण्याची तयारी आणि जनतेच्या हक्कांसाठी ठाम भूमिका घेण्याची क्षमता त्यांच्याकडे असल्याचे नागरिक सांगत आहेत. घरत कुटुंबाचा संघर्षाचा वारसा आणि जनतेशी असलेली नाळ या उमेदवारीला बळ देणारी ठरत आहे.
थळ मतदारसंघातील पंचायत समितीसाठी जाहीर करण्यात आलेले उमेदवारही शिक्षित, प्रशासकीय समज असलेले आणि जबाबदारीची जाणीव ठेवणारे असल्याचे चित्र आहे. केवळ सत्ता मिळवण्यासाठी नव्हे तर विकासासाठी काम करण्याची तयारी असलेले, शाळा, पाणी, रोजगार, आरोग्य, क्रीडा आणि पर्यटन यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर स्पष्ट भूमिका घेणारे उमेदवार शेकापने दिले असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. वर्षानुवर्षे सत्तेच्या जोरावर भीतीचं वातावरण निर्माण करून विकासापासून थळ मतदारसंघाला दूर ठेवण्यात आलं. रोजगार, शिक्षण, पर्यटन, क्रीडा आणि संस्कृती या प्रत्येक क्षेत्रात अपयश दिसून आलं. अशा पार्श्वभूमीवर शेकापची ही उमेदवारी म्हणजे दहशतीच्या राजकारणाविरोधातील थेट लढत असल्याचे बोलले जात आहे. एकूणच थळ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी शेतकरी कामगार पक्षाने दिलेली उमेदवारी ही नावासाठी नाही तर कामासाठी असल्याचा ठाम संदेश देणारी आहे. त्यामुळे थळ मतदारसंघात शेकापच्या या निर्णयाकडे परिवर्तनाची सुरुवात म्हणून पाहिले जात असून, जनतेतून या उमेदवारीला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.






