| पनवेल | वार्ताहर |
पनवेल येथे राहणार्या एका 39 वर्षीय व्यक्तीने त्याच भागात राहणार्या घटस्फोटित महिलेला लग्नाचे वचन देऊन तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून तिच्याकडून 7 लाख रुपये उकळून तिची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राकेश लदबे असे या व्यक्तीचे नाव असून, वाशी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील पीडित महिला पनवेल परिसरात आपल्या दोन मुलांसह राहण्यास असून, तिचा घटस्फोट झाला आहे. मार्च 2023 मध्ये राकेश लदबे याची पीडित महिलेसोबत ओळख झाली होती. या ओळखीतून त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर राकेश लदबे याने पीडित महिलेला लग्नाचे वचन देऊन तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने पीडित महिलेला वाशीतील जुहूगाव येथील सरस्वती बिल्डिंगमध्ये नेऊन तिच्यासोबत अनेक वेळा शरीरसंबंध प्रस्थापित केले. याच कालावधीत आरोपीने पीडित महिलेकडून वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून 7 लाख रुपये उकळले.
मागील 3 वर्षांपासून आरोपीने पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार केले. दरम्यानच्या काळात पीडित महिलेने आरोपीकडे पैसे परत मागितले असता, त्याने पैसे परत करण्यास नकार दिला. तसेच पीडित महिलेला शिवीगाळ व मारहाण करीत तिला धमकावले. या प्रकारानंतर पीडित महिलेने दोन दिवसांपूर्वी खांदेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपी राकेश लदबे याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी वाशी पोलिसांकडे वर्ग केला त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.







