। पनवेल । वार्ताहर ।
खारघर शहरात किरकोळ कारणावरून भर रस्त्यात 10 ते 15 सीआयएसएफच्या जवानांनी डॉ. श्रीनाथ परब यांच्यासह कुटुंबियांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खारघर शहरातुन आपल्या गाडीतून सेक्टर 12 येथून जात असताना सीआयएसएफच्या जवानांना घेऊन जाणार्या बस चालकाने परब यांची गाडी उजव्या बाजूने दाबली. अचानक अंगावर येणारी गाडी परब यांनी कशी बशी सावरली आणि बस चालकाला याबाबत जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी बसमधुन सीआयएसएफच्या संजीव नावाच्या जवानासह 3 ते 4 जवान खाली उतरून त्यांनी थेट श्रीनाथ परब यांना शिवीगाळ करून मारहाण करायला सुरुवात केली. हे भांडण सोडविण्यास गेलेल्या श्रीनाथ परब यांचा भाऊ प्रसाद परब यांना मारहाण करण्यात आली. मारहाण सोडविण्यासाठी गेलेल्या परब कुटुंबायातील महिलांना देखील सीआयएसएफच्या जवानांनी मारहाण केली आहे. यापैकी बहुतांशी जवान हे दारूच्या नशेत असल्याचा आरोपही परब कुटुंबीयांनी केला आहे.