खवय्यांना करवंद व कैर्‍यांची मेजवानी

आदिवासी महिलांना चांगला रोजगार

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।

बहुविध वृक्षराजीने समृद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यातील रानावनात करवंदाच्या जाळीत हिरवी टिपूर करवंद लगडली आहेत. शिवाय रानातील व आंबा बागेतील विविध प्रकारच्या आंब्यांना कैर्‍या लागल्या आहेत. त्यामुळे आंबट करवंद व कैर्‍यांवर खवय्ये तुटून पडत आहेत. त्यांना जणूकाही मेजवानी मिळत आहे. सुधागड तालुक्यात कच्ची करवंद बाजारात येऊ लागली आहेत. आणि आता इतरही तालुक्यात करवंद विक्रीसाठी येत आहेत. आदिवासी महिला रानातून ही हिरवी कच्ची करवंद गोळा करून टोपलीत घेऊन तालुक्याच्या बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. साधारण 10 रुपयांना एक वाटा मिळतो. आदिवासी महिलांना यातून चांगला रोजगार देखील मिळतो. याशिवाय रानातील व बागेतील विविध प्रकारच्या आंब्याच्या झाडांना कैर्‍या लगडल्या आहेत. या कैर्‍या देखील बाजारात विक्रीसाठी येत आहेत. 15 ये 20 रुपयांना 5 छोट्या कैर्‍यांचा वाटा मिळत आहे. याशिवाय काही दिवसांनी पिकलेली करवंद, तोरणं, भोकर, रांजण, चिकण्या, काजू आदी रानमेवा दाखल होईल.

आंबट कैर्‍यांची लज्जत
स्थानिक कैर्‍या सुक्या व ओल्या मासळीचे कालवण, वरण आदीमध्ये टाकल्या जातात. त्यामुळे जेवणाला वेगळीच लज्जत येते. याशिवाय फोडी करून हळद, मसाला व मीठ टाकून खाल्ल्या जातात किंवा लोणचं देखील केले जाते. सुकवून आंबोशी केली जाते. तसेच, पन्हं देखील केले जाते.
कच्ची करवंद
कच्ची करवंदाची चटणी केली जाते. मीठ, तिखट, कोथिंबीर व मिरची टाकून ही लज्जतदार चटणी केली जाते. शिवाय मीठ टाकून नुसती खाल्ली देखील जातात. काही जण मिठाच्या किंवा साखरेच्या पाण्यात टाकून खातात. तर, लोणचं देखील बनवले जाते.

कच्ची करवंद व कैर्‍या बाजारात मिळू लागल्या आहेत. बच्चेकंपनी व मोठे देखील आवर्जून या रानमेव्याचा आनंद घेतात. जिल्ह्यात हे विपुल प्रमाणात उपलब्ध आहे.

दामोदर हुले पोटलज
Exit mobile version