मोहोपाडा बाजारात निसर्गाची मेजवानी

| रसायनी | प्रतिनिधी |

श्रावण महिना सुरू होताच रसायनी परिसरातील मोहपाडा बाजारपेठेत विविध प्रकारच्या रानभाज्यांची आवक सुरू झाली असून, बाजारात सध्या रानभाज्यांची चंगळ पाहायला मिळत आहे. पावसाळ्यात डोंगरदऱ्या, शेतजमिनी आणि जंगल परिसरात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या या रानभाज्या खवय्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.

मोहोपाडा बाजारात टाकळा, कवळा, कुर्ला, तेरी, आळू, कर्टुले, शेवळा, भारंगी, माठ, कुरडू, शेकटा इत्यादी विविध रानभाज्या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत. स्थानिक नागरिकांकडून या पारंपरिक रानभाज्यांना विशेष पसंती दिली जात आहे. याबाबत माहिती देताना निसर्ग अभ्यासक, पक्षीनिरीक्षक व लेखक अनिल दाभाडे यांनी सांगितले की, श्रावण महिन्यापासून गौरी-गणपती सणापर्यंत मोहपाडा बाजारात विविध रानभाज्या उपलब्ध होत असतात. वर्षभरात प्रामुख्याने पावसाळ्यातच या रानभाज्या मिळत असल्याने त्यांना विशेष महत्त्व आहे.पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या या रानभाज्यांमध्ये विविध नैसर्गिक गुणधर्म असल्याचे जाणकारांकडून सांगितले जाते. त्यामुळे पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या या स्थानिक रानभाज्यांचा आस्वाद किमान एकदा तरी घ्यावा, असे जुनी जाणकार मंडळी सांगत असल्याचे दाभाडे यांनी नमूद केले. रानभाज्यांमुळे ग्रामीण भागातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीची आठवण ताजी होत असून, नव्या पिढीलाही या स्थानिक वनस्पती आणि पारंपरिक पाककृतींची ओळख होत आहे. त्यामुळे श्रावणात मोहोपाडा बाजारात येणाऱ्या या रानभाज्या नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.

Exit mobile version