। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईत भायखळा रेल्वे स्थानकावरील महिलांच्या सार्वजनिक शौचालयात एका विद्यार्थिनीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या भायखळा रेल्वे स्थानकावरील महिलांच्या सुलभ शौचालयात एका महाविद्यालयी विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. गुरुवारी (दि.5) ही घटना घडल्याचे समोर आले आहे. मानसिक तणावाखाली असलेल्या तरुणीने शौचालयात हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.
भायखळा रेल्वे स्थानकावरील महिलांच्या सार्वजनिक शौचालयात पीडित महाविद्यालयीन विद्यार्थिनी फ्रेश होण्यासाठी गेली. मात्र, खूप वेळानंतरही ती बाहेर आली नाही. त्यानंतर दरवाजा ठोठावून तसेच तिला आवाज दिल्यानंतरही तिने कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शौचालयात उपस्थित एका महिलेने ही माहिती तातडीने पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पीडितेला तात्काळ उपचारांसाठी सेंट जाॅर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या पीडित मुलीची प्रकृती स्थिर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच मानसिक तणावातून तिने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.






