। अलिबाग । प्रतिनिधी ।
पाळीव कुत्र्यावरून दोन गटात हाणामारी झाली. त्यामध्ये दोन्ही गटातील जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि.1) सायंकाळी वरंडेपाडा येथे घडली. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरंडेपाडा येथील पहिल्या फिर्यादी महिलेची कोंबडी शेजारच्या पाळीव कुत्र्याने पकडली होती. त्यावरून फिर्यादीच्या नातेवाईकांनी दगड मारून त्या कुत्र्याला हाकलून दिले. यावरून आरोपी व फिर्यादीमध्ये शाब्दीक वाद झाले. रागाच्या भरात आरोपीने फिर्यादीला काठीने मारहाण केले. तसेच त्यांचे पती व अन्य दोन जणांनीदेखील दांडक्याने मारहाण करून जखमी केले. तसेच दुसर्या फिर्यादी त्यांचा कुत्रा आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपीने काठीने फिर्यादी यांच्या नातेवाईकाला मारहाण केली. लाकडी दांडक्याने अन्य जणांना जखमी केले. ही घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वरंडेपाडा येथे घडली. याप्रकरणी पोलीस नाईक गव्हाणे, पोलीस नाईक सचिन वाघमारे अधिक तपास करीत आहेत.