। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
आकुर्ली येथील गॅरेजला आग लागली. ही घटना 31 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, गॅरेजमध्ये असलेल्या ऑडी आणि स्कॉर्पिओ या गाड्या जळून खाक झाल्याची माहिती अग्निशामक विभागाने दिली.
आकुर्ली गावाजवळ असलेल्या पाच गाळ्यांना सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक आग लागली. यात एक गादी घर, दोन गॅरेज, एक फर्निचर, एक स्टील दुकान यांचा समावेश आहे. आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली असता नवीन पनवेल अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच पनवेलची एक गाडी मदतीसाठी बोलवण्यात आली. त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीत ऑडी आणि स्कॉर्पिओ या दोन चार चाकी गाड्या जळाल्या आहेत. गॅरेजमध्ये 200 लिटर ऑइलचे ड्रम असल्यामुळे फोमचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
या आगीमुळे नेरे माथेरान रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही वेळानंतर अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, आगीचे कारण समजू शकलेले नाही.







