| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरान सेंट्रल हॉटेलमधील माळ्याच्या घराला शॉर्टसर्किटमुळे पहाटे तीन वाजता आग लागली. या आगीमध्ये घरात असलेल्या दोन सिलिंडर पैकी एका सिलिंडरचा स्फोट झाला. तर एक सिलिंडर सुरक्षित बाहेर काढण्यात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली .घरामध्ये कुणीही राहत नसल्याने जीवित हानी झाली नसली तरीसुद्धा घर पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने वित्तहानी झाली.
![](http://krushival.in/grygrars/2024/02/matheran-1-1024x768.jpg)
माथेरान नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे वाहन नादुरुस्त असल्याने मनुष्यबळाच्या सहाय्याने हॉटेलमधील पाण्याचा वापर करून आग नियंत्रणात आणली. यादरम्यान खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांनी देखील या घटनेची दखल घेऊन माथेरान नगरपरिषद व अधीक्षक कार्यालय तसेच पोलीस ठाणे यांना कळवली. यावेळी सहाय्यक फौजदार राजेश रामदास, अपघात ग्रस्त पथकाचे सदस्य दिनेश सुतार, माथेरान नगरपरिषदेचे नरेंद्र सावंत, अन्सार महापुळे, रामचंद्र चव्हाण, नरेश पुरबिया,कांती पुरबिया, रवी लोटणकर शैलेश वाघेला, रूपचंद वाघेला, ओम शिंदे,आदित्य शिंदे, चंद्रकांत जाधव, राजेश चौधरी तसेच रुग्णवाहिका चालक अमित भस्मा बचावकार्यात सहभागी झाले होते.
माथेरानमधील नगरपरिषदेच्या अग्निशामक गाडीचे ब्रेक निकामी झाले आहेत. आग विझविण्यासाठी लागणारे पाणी कुठून घ्यायचे, अशा तक्रारी मी नगरपालिकेत केल्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने गाडी बंद अवस्थेत उभी आहे. त्यामुळेच आज आगीच्या घटनेवेळी अग्निशामक गाडी उपलब्ध होऊ शकली नाही.
अजिंक्य सुतार, अग्निशामक वाहन चालक