आक्षी समुद्र किनार्‍यावरील सुरुच्या बनाला आग

। आक्षी । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील आक्षी समुद्रकिनारी सुरुच्या बनाला मंगळवारी (दि.14) संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास समाज कंटकांकडून आग लावण्यात आली. त्याठिकाणी काही प्रमाणात कचरा आणि गवत असल्याकारणाने आग पसरत गेली. दुरूनच धुराचे लोट निदर्शनास येताच आक्षी ग्रामपंचायत सदस्या रश्मी वाळंज व त्यांचे कुटुंबीय यांनी ही आग विझविण्याचा प्रयत्न केला असून त्यांना आग विझवण्यात यश आले. या आगीमुळे काही सुरुंचे नुकसान झाले आहे.


गेले काही दिवस वनसंपदेला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. हरित क्षेत्र पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या वनक्षेत्रांमध्ये सातत्याने मानवी विकृतीचे दर्शन घडत आहे. वनसंपदेला सातत्याने लागणार्‍या आगी सर्वांसाठीच चिंतेचा विषय बनला आहे. अनेकदा परस्पर आग विझविल्यानंतर वन विभागाकडूनही नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे काही घटनांमुळे समोर आले आहे.


वारंवार होणार्‍या आगीच्या घटना थांबविण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. अन्यथा वन संपदेचा र्‍हास होईल आणि त्यास वन विभाग जबाबदार असेल, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे.


वन अधिकारी नॉट रिचेबल
आक्षी समुद्र किनारी आग लागल्याचे निदर्शनास येताच ग्रामपंचायत सदस्या रश्मी वाळंज यांनी तातडीने वन विभागाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकार्‍यांसोबत संपर्क होऊ शकला नाही.

Exit mobile version