मरिन ड्राईव्हवर चाहत्यांचा महापुर

भारतीय संघाचे जल्लोषात स्वागत

| मुंबई | प्रतिनिधी |

भारताने टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. तब्बल 135 कोटी जनतेचे स्वप्न रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघाने पूर्ण केले. या विजयाचे सेलिब्रेशन देशभर सुरु असताना अवघ्या जगाच्या नजरा मात्र देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईवर होती. विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी मरीन ड्राईव्हवर चाहत्यांचा महापुर लोटला होता. भारतीय संघाची मिरवणूक ओपन बसमधून काढण्यात आली. त्यानंतर वानखेडे स्टेडीयमवर विजयोत्सव साजरा करण्यात आला.

2007 नंतर प्रथमच मुंबई पुन्हा ठप्प झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड चॅम्पियन म्हणून देशात परतला आहे. पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर टीम दिल्लीहून मुंबईला रवाना झाली. बीसीसीआयने नरिमन पॉइंट ते वानखेडेपर्यंत 1 किमीच्या विजय परेडची व्यवस्था केली होती. यावेळी मरीन ड्राइव्हवर जमलेल्या लाखो चाहत्यांनी खेळाडूंच्या विजयी घोषणा दिल्या. मुंबई क्रिकेट असोसिएशनने गुरुवारी संध्याकाळी भारताच्या टी-20 विश्वचषक विजय परेडसाठी वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांना विनामूल्य प्रवेशाची परवानगी दिली होती. दरम्यान, जगज्जेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी मुंबईतील गर्दी पाहून भारत आणि महाराष्ट्रातील जनतेचे क्रिकेटवर किती प्रेम आहे? याचा प्रत्यय गुरुवारी मुंबईतील गर्दी पाहिल्यानंतर आला.

टीम इंडियाला वॉटर सॅल्यूट मिळाला
टीम इंडियाच्या विस्तारा फ्लाइट ‌‘1845‌’ ला मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर वॉटर सॅल्यूट देण्यात आला. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या विमानाच्या दोन्ही बाजूला उभ्या राहिल्या आणि पाण्याचा फवारा मारला. विमानतळाबाहेरही चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. सर्वजण आपल्या आवडत्या क्रिकेटपटूची आतुरतेने वाट पाहत आहेत.
रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करुन दिला
मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी केल्यामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला होता. जमलेल्या क्रिकेट चाहत्यांनी प्रचंड गर्दीतून एका रुग्णवाहिकेला जाण्यासाठी रस्ता मोकळा करुन दिला. भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्हवर एवढ्या मोठ्या गर्दीमधूनही रुग्णवाहिकेला जाण्यासाठी काही सेकंदात रस्ता मोकळा करून दिल्यामुळे अनेकांकडून कौतुकही करण्यात येत आहे.
ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार
या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी मरीन ड्राइव्ह ते वानखेडेपर्यंत एक तीळही ठेवायला जागा उरली नव्हती. भारतीय संघ 17 वर्षांनंतर टी-20 चॅम्पियन बनला आहे. तत्पूर्वी गुरुवारी भारतीय संघ एका विशेष विमानाने दिल्ली विमानतळावर पोहोचला. कडक सुरक्षा आणि पावसाच्या दरम्यान टीम इंडियाच्या स्वागतासाठी चाहते सकाळपासून विमानतळावर उपस्थित होते . विमानतळावर पोहोचल्यानंतर रोहित शर्मा आणि कंपनीचे जोरदार स्वागत करण्यात आले. यानंतर भारतीय संघ दिल्लीतील मौर्या हॉटेलमध्ये पोहोचला. भारतीय संघाने मौर्या हॉटेलमध्ये खास केकही कापला. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासह सूर्यकुमार यादव, अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या ढोलाच्या तालावर नाचताना दिसले.
Exit mobile version