नेरळमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

दोन घरे फोडली, मंदिरातील मूर्तीची चोरी

| नेरळ | वार्ताहर |

नेरळ पोलीस ठाणे हद्दीत चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. चोरट्यांनी दोन घरे तर एका मंदिरामधील देवीची मूर्ती चोरून नेली असून, तीन वेगवेगळ्या ठिकाणी ही चोरी करण्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री घटना घडली असून, यात सोने, चांदी, रोख रक्कम असा मिळून तब्बल तीन लाखांच्या आसपास चोरट्यांनी ऐवज चोरून नेला आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कर्जत तालुक्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर चोरीचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले होते. परंतु, पुन्हा चोरट्यांनी डोके वर काढत पुन्हा एकदा चोरीचा सपाटा लावला आहे. काही दिवसांपूर्वी कर्जत-कल्याण राज्य मार्गावरील कर्जत देऊळवाडी येथील पाच दुकाने एकाच वेळी अज्ञात चोरट्यांनी लुटली होते. ही घटना ताजी असताना नेरळ पोलीस ठाणे हद्दीत चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. दोन घरे, तर एक मंदिर चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. शुक्रवार 14 जून रोजी पायरमाळ येथील राणे यांचे शंकराच्या मंदिरावर चोरट्याने हात घातला. मंदिरातील दान पेटी फोडता न आल्याने चोराने येथील पितळेची देवीची मूर्ती चोरून नेली आहे. सोबतच चांदीचे नाग, तर पितळेच्या समया चोराने लंपास केल्या आहेत. दरम्यान, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला असून, याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली.

याही अगोदर नेरळ पोलीस ठाणे हद्दीत 12 जून रोजी शेलू परिसरातील एन.डी. स्कूलजवळ स्वामी आश्रय या इमारतीमधील ए विंगच्या दुसर्‍या मजल्यावरील रूम नं 202 मध्ये फिर्यादी झोपले असताना चोरट्यांनी खिडकीमधून घरात प्रवेश केला. दरम्यान, बेडरूममधील लाकडी कपाटातून एकूण 1,56,000/- रुपये व सोन्याचे दागिने व रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे हे अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली आहेत. तिसर्‍या घटनेत नेरळ पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असणारे खांडा परिसरातील सेवालाल सोसायटीतील रूम नंबर. 03 दुसरा मजल्यावर चोरी झाली आहे. घरमालक घरात नसल्याचा फायदा घेत चोरट्याने बंद घराच्या दाराचा कडी कोयंडा तोडून घरातील किचन रुममध्ये असलेले कपाटाचे कुलूप फोडले आहे. कपाटाच्या आतील लॉकरमधील 1,13,000/- रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोराने लुटला. दरम्यान, तीन वेगवेगळ्या घटनेबाबत नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version