नेरळमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

दोन मेडिकल, एक बेकरी, तीन घरे फोडली

| नेरळ | वार्ताहर |

नेरळ शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, मेडिकल फोडण्याचा सपाटा लावला आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमार देशमुख हॉस्पिटल येथील शिशु केअर मेडिकल, नेरळ बाजारपेठेतील अर्णव मेडिकल फोडले. तसेच आता चोरांनी तालुक्यातील ग्रामीण भागदेखील लक्ष केले असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील कशेळे येथे रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने कशेळे येथील दोन घरे, एक बेकरीला लक्ष करत घरफोडी केली. त्यामुळे परिसरात चोरांची दहशत पसरली आहे.

कशेळे भागात काही महिन्यापासून गुरे, गायी, शेळ्या आदी चोरीच्या घटना घडत असताना आता थेट घरफोड्यांची घटना समोर आली आहे. 4 फेब्रुवारीच्या रात्री कशेळे येथे दोन घरे, एक बेकरी येथे रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरातील दरवाजाची कडी तोडून घरात घुसून कपाट फोडून मौल्यवान वस्तू चोरल्या. यामध्ये पद्मा अगिवले यांच्या घरातून 30 हजार रोख, एक चांदीचे नाणे तसेच संजय खंडवी यांच्या घरातून चांदीचे दागिने कपाट फोडून चोरी केले. तसेच जवळच साळूंखे यांची बेकरी आहे. त्या बेकरीमधून एक लाखांची रोख रक्कम चोरट्याने लंपास केली आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती कर्जत पोलिसांना देण्यात आल्यावर त्यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास कर्जत पोलीस करत आहेत. तर गेले काही दिवस परिसरात घरफोड्यानी कशेळे येथील व्यापारीवर्ग धास्तावला आहे. हातात शस्त्र घेऊन दरोडेखोर घरात घुसत आहेत. त्यामुळे या चोरट्यांचा लवकर बंदोबस्त करावा, तसेच कशेळे परिसरात गस्तीसाठी पोलीस तैनात करावेत, अशी मागणी कशेळे व्यापारी संघटनेने केली आहे.

Exit mobile version