| संभाजीनगर | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, महायुतीने उमेदवार जाहीर केला असला तरी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. विनोद पाटील यांना महायुतीकडून उमेदवारी मिळणार होती. मात्र, माझ्या उमेदवारीला विरोध केला गेला, असं पाटील यांनी म्हटलं आहे. विनोद पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर शिवसेनेची अडचण होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरची जागा महायुतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला सुटली. त्यानंतर शिंदेंनी संदीपान भुमरेंना उमेदवारी जाहीर केली आहे. संदीपान भुमरे यांची लढत ठाकरेंच्या चंद्रकांत खैरे यांच्याशी असणार आहे. याशिवाय एमआयएमचे इम्तियाज जलीलही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 2019 मध्ये इम्तियाज जलील यांनी विजय मिळवला होता. दरम्यान, विनोद पाटील यांनी निवडणूक लढवल्यास चौरंगी लढत पाहायला मिळू शकते.