कर्मचारी वर्गात भीतीचे सावट
| वावोशी | प्रतिनिधी |
केंद्र सरकारचा उपक्रम असणाऱ्या एच.आय.एल कंपनीच्या परिसरात नुकताच कोल्हा दिसल्याची घटना उघड झाल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. टेक्निकल बिल्डिंगच्या आवारात कर्मचारी अविनाश तांबे यांनी दुपारच्या सुमारास कोल्हा पाहिल्याचा दावा केला आहे. त्यांनी तत्काळ मोबाईलमध्ये फोटो टिपण्याचा प्रयत्न केला, मात्र कोल्हा क्षणात निसटल्याने प्रतिमा स्पष्ट मिळू शकली नाही. तरीही मिळालेल्या फोटोंच्या आधारे तो कोल्हाच असल्याचे अनेक कर्मचारी सांगत आहेत.
एचआयएल कंपनीचा काही भाग घनदाट झाडांनी व्यापलेला असल्यामुळे परिसर जंगलमय बनला आहे. त्यामुळे मागील काही वर्षांत या भागात विविध वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. 3 ते 4 वर्षांपूर्वी रानडुक्करांचे संचार येथे सहज पाहायला मिळत होते. माकडे तर अजूनही संध्याकाळी झाडांवरून उड्या मारत प्लांटमधील साहित्याची तोडफोड करताना दिसत आहेत. याच दरम्यान काहींनी मोर तसेच नव्या प्रजातींचे पक्षी दिसल्याचेही सांगितले आहे. अचानक कोल्हा आढळून आल्याने कंपनीतील कर्मचारी आता सावधगिरी बाळगण्याच्या तयारीत आहेत. वनक्षेत्र जवळ असल्यामुळे वन्यप्राणी कधीही कंपन्यांच्या आवारात शिरकाव करू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
