नागरिकांच्या सतर्कतेमुळे तिघे जेरबंद
| उरण | प्रतिनिधी |
उरण-चाणजे येथील मुळेखंड या ठिकाणांहून रविवारी (दि.25) मध्यरात्रीनंतर अंधाराचा फायदा घेऊन चारचाकी गाडीमधून गुरे पळवून नेणाऱ्या तिघांना अटक करण्यात उरण पोलिसांना यश आले आहे. या थरारक घटनेतून उमेश महादेव कोळी या तरुणाला व गुरांना चोरट्यांच्या तावडीतून सोडविण्यास नागरिकांना व पोलिसांना यश आले आहे.
चाणजे सरपंच अजय म्हात्रे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास उमेश कोळी हा तरूण कामावरून आपल्या घरी येत होता. त्याच दरम्यान एक व्यक्ती गुरांना पकडण्याचा प्रयत्न करत होता. यासंदर्भात उमेश यांनी त्याला जाब विचारला असता, त्या व्यक्तीने उमेशला पकडून दमबाजी केली आणि चारचाकी गाडीत बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रसंगावधान बाळगून उमेश कोळी यांनी आपल्या मोबाईलवरुन मित्रांना फोन करून तसेच गावातील ग्रुपवर मेसेज व्हायरल करून या घटनेबाबत माहिती दिली. त्यांचा हा मेसेज बघताच त्याच्या मित्राने संबंधित चारचाकीचा पाठलाग केला. यावेळी चोरट्यांनी गाडी पळविण्याचा प्रयत्न केला असता, चारचाकी गाडीला अपघात होऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या घटनेची माहिती तात्काळ उरण पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, संतप्त नागरिकांनी गुरे चोरून नेणाऱ्या व्यक्तीला चोप दिला आणि उमेश कोळीसह गुरांची सोडवणूक केली. त्यानंतर उरण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन गुरे चोरणाऱ्या तिघांसह चारचाकी गाडी ताब्यात घेतली.
काही दिवसांपासून उरण तालुक्यात गुरे चोरणाऱ्या टोळीच्या गाडीने धुमाकूळ घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेसंदर्भात उरण पोलिसांनी ठोस तपास करुन गुरे चोरणाऱ्या टोळीवर ठोस कारवाई करावी. तसेच, त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
-सचिन डाऊर,
सामाजिक कार्यकर्ते





