साडेचार लाखांचा ऐवज जप्त
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
दुचाकीस्वाराला रस्त्यात अडवून त्याची लूट करुन फरार झालेल्या पाच जणांना मांडवा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून साडेचार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, लुटमार करणारे तरुण अलिबाग तालुक्यातील ग्रामीण भागतील असल्याने पालकांसाठी चिंतेचा विषय झाला आहे. रोहित रमेश कडवे हा मिळकतखार मळा येथे राहणारा तरुण 7 जुलै रोजी घरी जात होता. त्याची दुचाकी मळा रोडवरील उघडीवर आली असता पाचजणांनी त्याला अडवले आणि मारहाण करुन त्याच्याकडील दोन सोन्याचे ब्रेसलेट व तीन सोन्याच्या अंगठ्या असा ऐवज घेऊन ते फरार झाले होते.
याबाबत रमेश याने मांडवा सागरी पोलीस ठाणे येथे तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे स. पोलीस निरिक्षक राजीव पाटील यांची टीम या प्रकरणाचा छडा लावण्यास कामाला लागली. अवघ्या सहा तासात आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. गौरव सुभाष शेळके (22) रा. झिराड, ता. अलिबाग, सम्राट सागर तोडणकर (24) रा. धोकवडे, गणेश सोपान साळुंखे (35) रा. झिराड, अक्षय सुरेश नाईक (28) रा. विर्तसारळ आणि गणेश शाम पगारे (23) रा. तळकरनगर, रामनाथ अशी त्यांची नावे आहे. त्यांच्याकडून साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
मांडवा सागरीच्या डी.पी. खाडे, विशाल शिर्के, एस.डी. मारकंडे, एस.एस. ठाकूर, ए.डी.सोळसे, पी.आर. देशमुख, व्ही.आर. चव्हाण, जी.के. पाटील, पी.के. प्रधान, सी.एस. म्हात्रे, ए.व्ही. पाटील, पी.एच. घरत, एस.ए. पाटील, एन.यू. शेख या टीमने ही कामगिरी पार पाडली. दरम्यान, जिल्ह्यात घडणार्या लुटमारीच्या घटनांमध्ये जिल्ह्याबाहेरुन येऊन चोर्या करणारे चोरटे असल्याचे अनेकदा समोर आले आहे. मात्र, या प्रकरणात अलिबाग तालुक्यातील छोट्या गावातील 22 ते 34 वयोगटातील तरुणांचा सहभाग आढळल्याने पालकांसाठी चिंतेचा विषय आहे.