ध्वनिरोधक यंत्रणा चोरणारी टोळी गजाआड

| पनवेल | वार्ताहर |

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर कर्नाळा अभयराण्याच्या परिसरातील महामार्गावरच्या दुतर्फात ध्वनिरोधक यंत्रणा बसवण्यात आली आहे. या यंत्रणेची चोरी एका टोळीने केली होती. या टोळीला रंगे हात पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे धाडसी काम कर्नाळा अभयराण्यातील वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले. या प्रकरणी तीन संशयीत आरोपींना पकडण्यात वन अधिकाऱ्यांना यश आले आहे.
महामार्गाच्या रुंदीकरणावेळी, कर्नाळा अभयराण्याचा मोठा भाग हा रुंदीकरणात गेला आहे. या महामार्ग वरील वाहनाच्या वर्दळीचा तसेच ध्वनिप्रदूषणाचा, या अभयारण्यातील पक्षी आणि प्राण्यांना फटका बसू नये यासाठी अभयराण्याच्या परिसरातून जाणाऱ्या महामार्गावर दोन्ही बाजूने उपाययोजना करत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ध्वनिरोधक यंत्रणा बसवली आहे.

सोमवारी रात्री, पहाटे या पत्र्यांची चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या टोळीला रंगे हात पकडण्याचे धाडसी काम अभयराण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी केले आहे. अभयराण्यातील वन रक्षक डी.डी. कांबळे, खानसाम अरुण वेळे, रखवालदार देविदास किलजे, मनोहर कानडे, दत्तात्रेय सळूखे हे अभयारण्यात रात्री गस्तीला होते, रात्र गस्त घालत असताना रस्त्याच्या बाजूला पत्र्याचा आवाज येऊ लागला होता, पत्र्याचा आवाज कसला येतो आहे, म्हणून कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर जाऊन पहाणी केली असता, काही अज्ञात इसम हे रस्त्याच्या शेजारी लावलेले पत्रे काढत असल्याचे दिसून येत होते.
याच वेळी या कर्मचाऱ्यांनी न घाबरता पळत जाऊन या चोरांना अटक केली, मात्र अंधार असल्याने या टोळीतील 2 ते 3 चोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले, मात्र तीन संशयीत आरोपींना पकडण्यात वन कर्मचाऱ्यांना यश आले आहे. या संशयीत आरोपींच्या टोळीने काही पत्रे देखील काढून रस्त्याच्या बाजूला ठेवलेले मिळून आले. या आरोपींना पकडल्यानंतर या चोरी ची माहिती वन कर्मचाऱ्यांनी पनवेल तालुका पोलिसांना दिली आणि या संशयीत आरोपींना पोलिसांच्या स्वाधीन केले. त्या मुळे या वन अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे. पत्रे काढण्यासाठी लोखंडी पार, लोखंडी रॉड आणि कटरचा वापर करून हे पत्रे, आरोपी काढत होते, या आरोपींना पकडल्या नंतर हे साहित्य पोलिसांकडे जमा केले आहे.

Exit mobile version