कशेडी घाटामध्ये गॅस टँकरला भीषण आग

चालकाच्या प्रसंगावधामुळे जीवितहानी टळली

। पोलादपूर । प्रतिनिधी ।

कशेडी घाटातील वळणावर शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका रिकाम्या टॅंकरला आग लागल्याची घटना घडली. महाड एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी वेळेत पोहोचून आगीवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळविले. तोपर्यंत पोलादपूर पोलीस आणि कशेडी टॅप वाहतूक पोलीसांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा वाहतुक थांबवित वाहतुकीवर नियंत्रण ठेवल्याने संभाव्य धोका टळला.

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील जयगड येथे शनिवारी (दि.29) सायंकाळी टँकरमध्ये इण्डेन कंपनीचा एलपीजी गॅस भरून तो खोपोली येथे रिकामा केल्यानंतर पुन्हा जयगड येथे ईण्डेन एलपीजी गॅस भरण्यासाठी जाताना भोगाव येलंगेवाडी दत्तवाडीच्या वळणावर (युपी-53-इटी-4129) टँकरच्या ड्रायव्हर केबिनला घाट चढताना वायरिंगमध्ये बिघाड होऊन आग लागली. पोलादपूरचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज म्हसकर, वाहतुक पोलीस धायगुडे, पोकॉ.पवार तसेच कशेडी टॅप वाहतूक पोलीस चौकीचे पीएसआय ए.पी.चंदने यांच्यासह सपोफौ सुर्वे, पोहेकॉ.साखरकर, पोहेकॉ. दाभोळकर, पोहेकॉ चालक दुर्गावळे यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात वाहतूक बंद केली.

महाड औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन आग विझवली. साधारणपणे तीन किलोमीटर अंतरापर्यंत कशेडी घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. मुंबई आणि गोवा या दोन्ही बाजूची वाहतूक काही अंतरावर थांबवुन तात्काळ फायर ब्रिगेड एमआयडीसी महाड व नगरपरिषद खेड यांना कळवून फायर ब्रिगेडच्या मदतीने केबिनला लागलेली आग साडेदहा वाजताच्या सुमारास विझवण्यात आली. टँकर चालक दत्ता पोपट भोसले रा.ग्रेटर बॉम्बे हा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन टँकरमधून उतरून टँकरपासून दूर सुरक्षित अंतरावर जाऊन राहिला. त्यामुळे कोणतीही जिवितहानी झाली नाही. आगीमध्ये टँकरची केबिन पूर्ण जळून गेली असून, टायरदेखील फुटून जळून गेले आहेत. टँकरची आग विझल्यानंतर तात्काळ दोन्ही बाजूकडील थांबवण्यात आलेली वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Exit mobile version